विधानपरिषदेसाठी नेमकं काय आहे समीकरण?
विधानपरिषदेला एका जागेसाठी २७ मतांचा कोटा आहे. हे मतदानही गुप्त पद्धतीने होणार आहे. त्यामुळे केवळ अपक्षच नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील आमदारही कोणाला मतदान करतात, हे पाहणे शक्य नसल्यामुळे या पक्षांची मतेही फुटण्याची शक्यता आहे.
भाजपच्या चार उमेदवारांना निवडून येण्याची फारशी चिंता नाही. मात्र, पाचवा उमेदवार प्रसाद लाड व सहावा उमेदवार सदाभाऊ खोत या दोघांनीही आम्ही आरामात निवडून आणू, असे आता भाजपचे नेते बोलत आहेत. हे दोघेही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेल्यानंतरही रिंगणात राहिलेच, तर भाजप काहीही करून एकनाथ खडसे यांच्या विरोधात मोठा सापळा रचणार, तसेच शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी पाडवी यांच्यामागेही भाजप लागणार, असे भाजपचे नेते खासगीत सांगत आहेत. आमशा पाडवी हे आदिवासी समाजातील असून, त्यांचा आमदारांशी फारसा संपर्कही नाही. तसेच शिवसेनेचे दुसरे उमेदवार सचिन अहिर हे माजी मंत्री असून, त्यांचे सर्व पक्षांत मित्र आहेत. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे देखील अहिर यांचे मित्र असल्याने अहिर यांच्या मतांवर भाजपकडून डल्ला मारण्याचा फारसा प्रयत्न होणार नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.