विधान परिषदेचा अर्ज मागे घ्यायला अगदी ५ मिनिटांची वेळ शिल्लक असताना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सत्तारुढ पक्षात खूप मोठा अनरेस्ट असल्याने आम्ही पाचवी जागा लढवत असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच मोठ्या प्रमाणात आम्हाला आमदार मदत करतील, अशी चेतावनीही फडणवीसांनी सत्ताधारी पक्षाला दिली.
पाचवी जागा लढवणं आणि जिंकून आणणं हे सोपं नाही, पण आम्ही करुन दाखवणार!
“आमची अपेक्षा अशी होती की सत्तारुढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी. सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी तसा प्रयत्नही केला. पण ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आज आम्ही सदाभाऊ खोत यांचा अर्ज माघारी घेतला आहे. आम्ही ५ जागा लढवतोय. सत्तारुढ पक्षात खूप मोठा अनरेस्ट आहे, त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवीये, म्हणून आम्ही ५ वी जागा लढवतोय. त्याचे काही आराखडे तयार केले आहेत. पाचवी जागा लढवणं आणि जिंकून आणणं हे सोपं नाहीये. पण मला विश्वास की आम्ही ५ वी जागा जिंकणार”, असं फडणवीस म्हणाले.
“सत्तारुढ गटांकडून माझ्याशी चर्चा झाली होती. त्यांनी बिनविरोध निवडणूक करण्यासाठीचा प्रयत्न केला. पण काँग्रेसने उमेदवार मागे घ्यायला नकार दिल्याने बिनविरोधाचे प्रयत्न फसले. पण आता निवडणूक लागलीय तर मला विश्वास की आम्ही ५ वी जागा जिंकणारच”, असं फडणीस म्हणाले.
भाजपकडून आता विधान परिषदेच्या रिंगणात कोण?
सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता भाजपचे अधिकृत ५ उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात असतील. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार आता विधान परिषदेची निवडणूक लढवतील.