तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध भागांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. काल युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्यामुळे आज मुंबईत राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स बाजूबाजूला लागल्याचे चित्र आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून नागरिकांना ५४ रुपये प्रतिलीटर दराने पेट्रोलचे वाटप केले जात आहे.
मुंब्य्रात राज ठाकरेंचे बॅनर्स फाडले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज १४ जून रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुंब्रा परिसरातही असेच शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. मात्र १३ जून रोजी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी हे बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इरफान सय्यद यांच्याकडून मुंब्रा परिसरात बॅनर्स लावण्यात आले होते. मुंब्रा येथील नुरानी हॉटेलसमोरील रस्त्यावर हे बॅनर लावण्यात आले होते.
राज ठाकरेंचा टॅटू
राज्याच्या विविध भागांतील मनसैनिक आपापल्या पद्धतीने राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. सोलापूरच्या माढ्यात राहणाऱ्या एका मनसैनिकाने राज ठाकरे यांचा टॅटू आपल्या छातीवर काढला आहे. विशाल भांगे असे या तरुणाचे नाव आहे. विशाल भांगे मोडनिंब या गावात राहतो. तो गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांना चाहता आहे. राज ठाकरे कायम हृदयात राहावेत, यासाठी मी हा टॅटू छातीवर गोंदवून घेतल्याचे विशालने सांगितले.
‘कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्या ‘
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन मनसैनिकांना एक आवाहन केले होते. कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली. आता पुन्हा तोच प्रकार नको म्हणून यावेळी वाढदिनी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.