परभणी : प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत एसटी महामंडळ प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गंभीर घटना टाळण्यासाठी चालकाने मद्यप्राशन केलं आहे की नाही, याची खात्री करूनच त्यांना गाडी दिली जाणार आहे. याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना एसटी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकाकडून नुकत्याच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार चालकांची अचानक तपासणी केली जाणार आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांना होणाऱ्या अपघातामध्ये घट होण्यास मदत होणार आहे.

एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीनुसार वाहतूक नियंत्रकांनी कामावर जाणाऱ्या चालक आणि वाहकांनी मद्यप्राशन केलं आहे की नाही याची खात्री करून कर्तव्यावर पाठवणे आवश्यक आहे. अशी खात्री केल्यानंतरच यापुढे बसस्थानकामध्ये गाडी चालक आणि वाहकाच्या ताब्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्तव्यावर हजर होणाऱ्या चालकाने मद्यप्राशन केले असल्यास त्याची माहिती वाहतूक नियंत्रकांना स्थानकप्रमुख अथवा आगारप्रमुखांना द्यावी लागणार आहे.

मद्यप्राशन केलेल्या संबंधित चालकाची नियमानुसार वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि पोलिसात फिर्याद दिली जाणार आहे. राज्यातील सर्व आगारांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांची असणार आहे.

Raj Thackeray Birthday: शिवतीर्थबाहेर मनसैनिकांना साजरा केला साहेबांचा बर्थडे; राज ठाकरेंनी गॅलरीत येऊन शुभेच्छा स्वीकारल्या

तपासणी पथकांद्वारे राबवणार मोहीम

राज्यातील सर्व विभागांमध्ये गोपनीय पद्धतीने चालकाने मद्यप्राशन केली आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी मार्ग तपासणी पथके, वाहतूक निरीक्षक, चालन प्रशिक्षण आणि सुरक्षा व दक्षता विभागातील पर्यवेक्षक यांच्यामार्फत मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये चालकाने मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करावी, अशा सूचना एसटी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करणाऱ्या चालकावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

बडतर्फीची होणार कारवाई

कर्तव्य बजावत असताना चालक अथवा वाहकाने मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर एसटी महामंडळ प्रशासनाकडून बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. मद्यप्राशन केलेल्या चालक-वाहकाला थेट घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. याबाबत चालक-वाहकांना अवगत करण्याची जबाबदारी विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

हळदीचे भाव उतरले , शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here