अयोध्या: सध्याच्या काळात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी चढाओढ सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे दुषित झाले आहे. पूर्वीच्या काळी विरोधकांशी अदबीने वागण्याची संस्कृती होती. पंडित नेहरुंपासून ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापर्यंत ही संस्कृती जपली गेली. दुर्दैवाने आजच्या राजकारणातील सहिष्णुता संपली आहे. विरोधी विचारांच्या आणि धर्माच्या लोकांना चिरडले जात आहे. हे प्रभू श्रीरामांचं हिंदुत्व नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते मंगळवारी अयोध्येत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Shivsena leader Sanjay Raut in Ayodhya)

राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या म्हणजे १५ जूनला अयोध्येत जात आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देशातील सद्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाची व्याख्या पुन्हा एकदा स्पष्ट केली. प्रभू श्रीरामांनी कधी द्वेषाच राजकारण केलं नाही. प्रसंगी वनवास पत्कारला. त्यांनी अहंकारी रावणाला संपवलं, हे त्यांचं हिंदुत्व होते. पण आज देशात जे आपल्या विचारांचे नाहीत, आपल्या धर्माचे नाहीत, त्यांच्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. जे सत्य बोलतात, त्यांना खोट्या खटल्यांमध्ये गुंतवायचे, चौकशीला बोलवायचं, हे हिंदुत्व नव्हे. हिंदुत्व हे खूप व्यापक आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

प्रभू श्रीरामांनी समन्वयाचं राजकारणं केलं. समन्वयाने अहंकार दूर करणे हा हिंदुत्त्वाचा भाग आहे. आज दुर्दैवाने देशाच्या राजकारणातून समन्वयाचं हिंदुत्व आणि संयम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांनी प्रभू श्रीराम आपला आदर्श असल्याचे सांगण्याच कारण नाही. अयोध्येतील राम मंदिर आंदोलन म्हणा किंवा हिंदुत्वासाठीची अन्य पातळ्यांवरील लढाई म्हणा, यामध्ये शिवसेनेचा खारीचा का होईना वाटा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
राऊतांच्या खांद्यावरचा विजयाचा गुलाल निघाला नाही तोच सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
एखाद्या धर्माचा द्वेष करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे: संजय राऊत

संजय राऊत यांनी भाजपच्या आक्रमक हिंदुत्वावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले. आमचं हिंदुत्व हे एखाद्या धर्माच्या प्रमुखांवर चिखलफेक करणारं किंवा धर्माचा द्वेष करणारं नाही. राज्यकर्त्यांनी राज्य सूडाच्या आणि बदल्याच्या भावनेने चालवू नये, असेही संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयीही माहिती दिली. आदित्य ठाकरे उद्या अयोध्येत दाखल होतील. शरयू नदीच्या तीरावर ते महाआरती करतील. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून नाशिक, मुंबई आणि ठाण्यातील शिवसैनिक अयोध्येत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here