अयोध्या: देशात भाजपविरोधी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु असतानाच आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक गुगली टाकली आहे. संजय राऊत यांनी, भाजपनेच शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा आणि एक मजबूत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी. देशाच्या घटनेचे रक्षण करायचे असेल, जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि या देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते मंगळवारी अयोध्येत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Presidential Polls 2021)

यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली पाहिजे. पण अशी संधी देण्यासाठी राज्यकर्त्यांचं मन मोठं असावं लागतं. राज्यकर्त्यांचं मन मोठं असेल तरच शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना पाठबळ दिले जाते, असेही संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत शिवसेनेची भूमिका अद्याप ठरली नसल्याचेही सांगितले. विरोधी पक्षांनी एकत्र बसून याबाबत निर्णय घ्यायला हवा. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा सर्वांच्यादृष्टीने स्वीकारार्ह आणि खंबीर असा हवा. असा उमेदवार शोधणे हे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, हे ठरवतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.
राष्ट्रपती निवडणूक: शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; विरोधी पक्ष बुचकळ्यात!
राष्ट्रपतपीसाठी शरद पवारांना ‘आप’चा पाठिंबा

शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्यास त्यांना आम आदमी पक्षाकडून (AAP) पाठिंबा जाहीर केला जाईल, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केले होते. येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यानंतर २१ जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी गटातील नेत्यांमध्ये भेटीगाठींचे सत्र सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी नुकतीच शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती.

या भेटीत झालेल्या चर्चेबाबत आप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून फारशी वाच्यता करण्यात आलेली नाही. परंतु, ‘आप’चा शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. आपचे खासदार संजय सिंह आणि शरद पवार यांच्यात याविषयी चर्चाही झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरणार की नाही, हे स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here