राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेनेचे प्रमुख नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे उद्या शरयू नदीच्या तीरावर महाआरतीही करणार आहेत. या सगळ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत आज संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर जाणार आहेत. त्यावेळी खासदार बृजभूषण सिंह हे संजय राऊत यांची भेट घेतील, अशी माहिती आहे.
राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येत येणार होते. मात्र, या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. राज ठाकरे यांनी त्यांच्या आंदोलनांवेळी उत्तर भारतीयांना त्रास दिला होता. त्यामुळे राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. भाजप नेत्यांनी हस्तक्षेप करूनही बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या दिवशी बृजभूषण सिंह यांनी शरयू नदीच्या काठी मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा इरादा जाहीर केला होता. मनसैनिक अयोध्येत आल्यास त्यांना शरयूत बुडवू, अशी गर्जनाही बृजभूषण सिंह यांनी केली होती. बृजभूषण सिंह यांचा कडवा विरोध पाहून राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा पुढे ढकलला होता.
या सगळ्या वादानंतर बृजभूषण सिंह यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची फूस असल्याचा आरोप करण्यात आला होता. सोशल मीडियावर बृजभूषण सिंह आणि शरद पवार यांच्या भेटीची अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत आणि बृजभूषण सिंह यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘माझा विरोध राज ठाकरेंना, ठाकरे कुटुंबीयांना नव्हे’
राज ठाकरे यांना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे. माझा विरोध राज ठाकरे यांना आहे, ठाकरे कुटुंबाला नाही. त्यामुळे राज यांच्या आई, पत्नी किंवा कुटुंबातील कोणीही अयोध्येत आलं तर मी स्वत: त्यांचं आदरातिथ्य करेन. परंतु राज ठाकरे यांना माझा विरोध कायम आहे. माफी मागत नाही तोपर्यंत राज ठाकरेंना विरोध कायम राहील, असे बृजभूषण यांनी स्पष्ट केले होते.