आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परभणी बस स्थानकाला भेट दिली
परभणी येथील बसस्थानकाची इमारत जमीनदोस्त करून याठिकाणी नवीन बस पोर्ट उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. याला जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटला असला तरी कामाला हवी तशी गती प्राप्त झाली नसल्याने बस पोर्ट काम रखडले आहे. तर पत्राचे शेड मारून पर्यायी बसस्थानक निर्माण करण्यात आले असल्यामुळे प्रवाशांना अपुऱ्या जागेमुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परभणी बस स्थानकाला भेट देऊन बस पोर्टच्या कामाची आज मंगळवारी पाहणी केली.
‘बस पोर्टचे काम चार महिन्यात पूर्ण करावे अन्यथा जेलमध्ये टाकू’
यावेळी बस पोर्टचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने आमदार डॉ. राहुल पाटील यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी कंत्राटदाराला बस पोर्टचे काम चार महिन्यात पूर्ण करावे अन्यथा जेलमध्ये टाकू अशी तंबी दिली आहे. बस पोर्ट प्रवाशांसाठी चार महिन्यात कोणत्याही परिस्थितीत खुले करावे असे आमदार डॉ. पाटील यांनी कंत्राटदाराला बजावले आहे.
‘प्रवाशांना सुसज्ज असा सिनेमा हॉल उपलब्ध होईल’
‘तर कोविड मुळे पासपोर्टचे काम रखडले आहे. आता कंत्राटदाराला असून चार महिन्यात बस पोर्ट निर्मितीचे काम पूर्ण होईल. याठिकाणी प्रवाशांना सुसज्ज असा सिनेमा हॉल उपलब्ध होईल. अत्याधुनिक सुविधा मिळतील’, असे यावेळी बोलताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले.