खंडवातील जेवर पोलीस ठाण्यात नानकराम रामेश्वर गवळीविरोधात २००७ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं गवळीला जामीन दिला. मात्र त्यानंतर तो फरार झाला. न्यायालयानं हजर राहण्यासाठी वारंवार नोटीस बजावूनही गवळी न्यायालयात हजार राहिला नाही. अखेर न्यायालयानं त्याच्या अटकेचे आदेश काढले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर १० हजाराचं बक्षीस जाहीर केलं.
नानकराम गवळी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांनी दिली. तिथे तो जादूचे प्रयोग करत असल्याचं पोलिसांना समजलं. गवळीनं तिथे आपलं आधार कार्डही तयार करून घेतलं होतं.
फरार झाल्यानंतर नानकराम गवळी ग्वाल्हेर, लखनऊ आणि मुझफ्फरपूरमध्ये वास्तव्यास होता. या दरम्यान तो जादूची कला शिकला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गवळी जादूचे प्रयोग दाखवू लागला. त्याच्यासोबत त्याची एक टीम होती. त्यात अनेक मुलींचादेखील समावेश होता.
बलात्कार प्रकरणात फरार असलेला आरोपी नानकराम गवळी पाटण्यात जादूचा खेळ दाखवण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर खंडवा पोलीस पाटण्याला रवाना झाले. त्यांनी तिकिटं काढून जादूचा कार्यक्रम पाहिला. संपूर्ण कार्यक्रम पाहून झाल्यानंतर पोलीस उठले आणि त्यांनी गवळीला अटक केली.