अहमदनगर : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. अण्णा हजारे (Anna Hazare) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत. मात्र, गेल्यावर्षीही खोचक शब्दांत शुभेच्छा देणाऱ्या आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावेळीही त्याच पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्यावेळी चीनच्या विषयात लक्ष घालावे म्हणून तर यावेळी लष्करातील कंत्राटी भरतीवर हजारे यांनी बोलावे अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे, ‘प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत. त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा.’
‘८५ वर्षांच्या वयात उपोषण होणार नाही हीच इच्छा’, अण्णांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
असे म्हणून आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या ताज्या निर्णयावरही टीका केल्याचे दिसून येते. भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. मात्र, यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. तोच धागा पकडून आव्हाड यांनी हे ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी अण्णा हजारे यांना खोचकपणे लक्ष्य केले.

अण्णा हजारे यांना खोचक शब्दांत शुभेच्छा देण्याची आव्हाड यांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्यावर्षीही आव्हाड यांनी अशाच खोचक शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी म्हटले होते, ‘प्रिय अण्णा, प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, करोनामुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता.’ आव्हाड यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी आव्हाड यांच्या खोचक संदेशाचं समर्थन केलं आहे. तर, काहींनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here