नवी दिल्ली: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोदी सरकारनं खूषखबर दिली आहे. केंद्र सरकार पुढील दीड वर्षांत १० लाख पदं भरणार आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये पुढील काही महिन्यांत मेगाभरती असेल. १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ८.७२ लाख पदं रिक्त असल्याची माहिती सरकारनंच या वर्षीच्या सुरुवातीला संसदेत दिली होती.

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये मिळून एकूण ८ लाख ७२ हजार २४३ जागा रिक्त असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी फेब्रुवारी-मार्चमध्ये संसदेत दिली होती. १ मार्च २०१९ रोजी ९ लाख १० हजार १५३ जागा रिक्त होत्या. त्याआधी १ मार्च २०१८ रोजी ६ लाख ८३ हजार ८२३ पदं रिक्त होती. एसएससी, यूपीएससी आणि आरआरबीनं २०१८-१९ आणि २०२०-२१ च्या दरम्यान २ लाख ६५ हजार ४६८ पदं भरली.

८ वर्षांपूर्वी २ कोटी, आता १० लाख नोकऱ्या, हे जुमला नाही महाजुमला सरकार: राहुल गांधी
रेल्वेत २.३ लाख पदं भरली जाणार
केंद्र सरकारमध्ये ४० लाख पदं आहेत. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या ३२ लाखांच्या खालीच आहे. अनेक वर्षांपासून ही पदं रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदं पोस्ट ऑफिस, डिफेन्स (सिव्हिल), रेल्वे आणि महसूलसारख्या मोठ्या मंत्रालयं आणि विभागांमध्ये आहेत. सर्वाधिक रिक्त जागा रेल्वेत आहेत. रेल्वेमध्ये २.३ लाख पदं रिक्त आहेत.

नागरी संरक्षण विभागात २.५ लाख पदं रिक्त
नागरी संरक्षण दलात एकूण ६.३३ लाख कर्मचाऱ्यांची गरज आहे. यापैकी २.५ लाख पदं रिक्त आहेत. पोस्टात एकूण २.६७ लाख जागा आहेत. पैकी ९० हजार जागा भरायच्या आहेत. महसूल विभागात १.७८ लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. पैकी ७४ हजार जागा रिक्त आहेत. गृह मंत्रालयात एकूण १०.८ लाख कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र १.३ लाख पदं रिकामी आहेत.
१० लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा आताच का? जाणून घ्या मोदींच्या घोषणेमागचा राजकीय अर्थ
सरकारच्या सर्व विभागांमध्ये मिळून ४०.०५ लाख जागा आहेत. यातील ८.७२ लाख पदं रिक्त असल्याची माहिती सरकारनंच १ मार्च २०२० रोजी दिली. यातील सर्वाधिक जागा क गटातील आहेत. क गटात मोडणारी ७.५६ लाख जागा रिक्त आहेत. तर ब गटात ९४ हजार ८४२ जागा भरायच्या आहेत. अ गटातील रिक्त जागांची संख्या २१ हजार २५५ इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here