सकाळी ९ च्या सुमारास तरुण मोठ्या संख्येनं बक्सर रेल्वे स्थानकात पोहोचले. त्यांनी रेल्वे रुळांवर ठिय्या दिला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेस जवळपास एक तासभर पुढे सरकू लागली. यावेळी काही तरुणांनी पाटण्याला जात असलेल्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर दगडफेक केली. सध्या आरपीएफकडून रेल्वे रुळ मोकळे करण्याचं काम सुरू आहे. जीआरपी घटनास्थळी कार्यरत आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे ४ वर्षे आम्हाला काम मिळेल. मात्र त्यानंतर आम्ही काय करायचं, असा प्रश्न तरुणांनी उपस्थित केला.
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती होणारे तरुण ४ वर्षे अग्निवीर म्हणून सेवा देतील. यातील २५ टक्के अग्निवीरांना पुढे संधी दिली जाईल. पण मग उरलेल्या ७५ टक्के तरुणांचं काय? ४ वर्षांनंतर त्यांच्याकडे कोणते पर्याय असतील? भले सरकार त्यांना जवळपास १२ लाख रुपये देणार असेल. पण त्यांना दुसरी नोकरी देण्यासाठी सरकारकडे कोणती योजना आहे?, असे प्रश्न तरुणांनी विचारले.
अग्निपथ योजनेत नेमकं काय?
– दर वर्षी जवळपास ४५ हजार तरुणांना सैन्यात सहभागी करण्यात येईल
– साडे सतरा ते साडे एकवीस वर्ष वयोगटातील तरुणांनाच योजनेला लाभ मिळेल
– मेरिट आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर भरती होईल
– निवड झालेल्या तरुणांना चार वर्षे सैन्यात सेवा देता येईल
– चार वर्षांत अग्निवीरांना ६ महिन्यांचं बेसिक प्रशिक्षण देण्यात येईल
– अग्निवीरांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये पगार आणि अन्य फायदे मिळतील
– या कालावधीत अग्निवीरांना स्थायी सैनिकांप्रमाणेच पदकं, पुरस्कार आणि विमा संरक्षण मिळेल
– चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर २५ टक्के अग्निवीरांना स्थायी केडरमध्ये भरती करण्यात येईल
– चार वर्षे सेवा दिल्यावर ज्या अग्निवीरांना पुढे संधी मिळणार नाही, त्यांना सेवा निधी पॅकेजच्या अंतर्गत जवळपास १२ लाख रुपये एकरकमी मिळतील