परळी: भाजी मार्केटमध्ये विकण्यास मनाई करण्यात आल्याने भाजीपाला विकायचा कुठे? असा प्रश्न पडलेल्या १०० भाजीविक्रेत्यांनी थेट पालकमंत्री यांच्या निवासस्थानी धाव घेतली. या सर्वांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर मुंडे यांनी हा भाजीपाला वाया जाऊ नये म्हणून त्यांच्याकडील सर्वच्या सर्व भाजीपाला विकत घेऊन त्यांना दिलासा दिला. हा भाजीपाला आता परळीतील गरजूंना मोफत वाटप केला जात आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी भाजीपाला मार्केटमध्ये भाजी विक्री करण्यास विक्रेत्यांना मज्जाव केला होता. त्यांना गल्लोगल्ली जाऊन भाजी विकण्यास सांगितलं होतं. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणातील भाजीपाला गल्लोगल्ली न्यायचा कसा? असा प्रश्न पडल्याने या १०० भाजीविक्रेत्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सकाळीच धडक दिली. त्यानंतर त्यांनी मुंडे यांच्यासमोर त्यांची कैफियत मांडली. त्यावर मुंडे यांनी कोणताही विचार न करता अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा भाजीपाला त्यांच्या ‘नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत विकत घेतला असून तो नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकरवी शहरातील गरजू नागरिकांना मोफत वाटप केला जात आहे.

काही शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादन जास्त प्रमाणावर आहे, अशा शेतकऱ्यांना दररोज तो शहरात आणून गल्लोगल्ली फिरून विकणे शक्य होत नाही, तसेच काही शेतकरी/व्यापारी वयोवृद्ध असल्यामुळे त्यांनाही फिरून विकण्याची अडचण होते. शिवाय बऱ्याच जणांना विकण्यासाठी वाहनांची अडचणही आहे, असं या शेतकऱ्यांनी मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. काही शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्याच्या कडेला बसून विकण्याबाबत परवानगी मागितली आहे. तर काहींनी भाजीपाला ठोक विक्रीचे बीट सुरू करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन मुंडे यांनी त्यांना दिलं. यावेळी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख, अय्युबखान पठाण, भाऊड्या कराड यांसह स्थानिक अधिकारी, व व्यापारी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत विशेष खबरदारी घेतल्याचेही दिसून आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here