मुंबई: सत्यघटनांवर सिनेमा काढण्याच्या ट्रेंडमध्ये यावर्षीच्या सुरूवातीला झळकलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. काश्मीरमधील हिंदू पंडितांवर झालेला अन्याय हा या सिनेमाचा गाभा होता. या सिनेमात अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एका काश्मिरी पंडिताची भूमिका केली होती. कुणी या सिनेमाचं कौतुक केलं तर कुणी या सिनेमातील दृश्ये सत्यघटनेपासून फारकत घेणार आहेत असं म्हणत ट्रोल केलं. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) याने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.

The Kashmir Files

काहीही असलं तरी या सिनेमाने ३० वर्षापूर्वी काश्मीरमध्ये घडलेल्या हत्याकांडाच्या आठवणी जाग्या केल्या. सिनेमा प्रदर्शित होऊन चार महिने उलटून गेल्यानंतरही या सिनेमाची चर्चा सुरूच आहे. आता अनुपम खेर यांनी या सिनेमाच्या संदर्भाने एक ट्वीट केलं आहे आणि त्यावरूनच काही पत्रकारांशी अनुपम खेर यांची बाचाबाची झाली. टवीटरवर हा वाद रंगला आहे.

हे वाचा-कर्जबाजारी होता हा सुपरस्टार, एका सिनेमाने कमावून दिले ३०० कोटी

अनुपम खेर यांनी असं ट्वीट केलं आहे की, आतंकवाद्यांच्या गोळीबाराची शिकार ठरलेल्या काश्मिरी पंडितांचं श्राध्द करण्यासाठी ते वाराणसीला जात आहेत. या ट्वीटला एका पत्रकाराने कमेंट केली आहे की, तुम्हाला वाराणसीला जाण्याऐवजी काश्मीरला जाण्याची गरज आहे, कारण तिथं परिस्थिती गंभीर आहे. काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्यपालांची भेट घेतली पाहिजे. मग श्राध्द घाला.

अनुपम खेर ट्वीट

यावर गप्प बसतील ते अनुपम खेर कसले. त्यांनी असं लिहिलंय की, तुम्ही पत्रकार या नात्याने लेख लिहा की कसं काश्मीर गेल्या ३५ वर्षात आतंकवाद्यांचा बळी ठरलं आहे. तेथील माताभगिनी दहशतीखाली जगत आहेत. आंतकवाद्यांनी कशी अनेक कुटुंबांची राखरांगोळी केली. मी ज्यांची पूजा करण्यासाठी वाराणसीला जातोय ते आतंकवाद्यांच्या अत्याचाराला बळी पडले आहेत.

त्यावरूनही या पत्रकाराने अनुपम खेर यांच्यावर तोंडसुख घेतलंय. ते म्हणतात, आम्ही तर सतत लिहित असतोच. पण काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला, हिंसा झाली त्याला तत्कालीन सरकार दोषी होतं याचा विसर पडतोय. तुम्ही, द काश्मीर फाइल्स या सिनेमातही सोयीस्करपणे हे वास्तव न दाखवता सरकारला पाठीशी घातलं आहे. तुमच्या सिनेमामुळे नकारात्मक संदेश दिला आहे. काश्मीरमध्ये आणि देशात चुकीच्या पध्दतीने हा विषय गेला आहे. द काश्मीर फाइल्स सिनेमाच्या निमित्ताने अनुपम खेर यांच्या वाराणसी दौऱ्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या या सवालजवाबाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

हे वाचा-‘राज ठाकरेंमुळे TV वर पुनरागमन केलं..’, भरत जाधवने सांगितला तो किस्सा

दरम्यान, द काश्मीर फाइल्स या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सिनेमाचं समर्थन केलं होतं. तर काहीजणांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण या वातावरणातही या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील वातावरण अशांत बनलं आहे. अनेक काश्मिरी पंडित स्थलांतर करत आहेत. आंतकवादी हल्ले होत आहेत. सोशल मीडियावर या घटनांसाठी द काश्मीर फाइल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनीही या सिनेमावर बंद आणण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अनुपम खेर हे काश्मिरी हिंदूंच्या श्राध्दासाठी वाराणसीला जाण्यावरून दोन वैचारीक गट आमनेसामने आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here