याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा डेपोची एमएच ४० एन ९५८८ क्रमांकाची बस सोमवारी सकाळी ९ वाजता सुरतसाठी रवाना झाली. या बसवर श्याम कराळे रा. बुलडाणा चालक तर प्रमोद माळोदे वाहक म्हणून कार्यरत होते. सदर बस गुजरातच्या सीमेत दाखल होऊन व्याराजवळ पोहोचली असता रात्री बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला एक गॅरेज होते मेकॅनिकला बोलावण्यासाठी चालक व वाहक दोघे रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने वाहक प्रमोद माळोदे याला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत वाहकाला व्यारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी व्यारा पोलीस ठाण्यात स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मागील काही काळापासून बुलडाणा डेपो आपल्या भोंगळ कारभारामुळे चर्चेत आहे. येथील अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बसेसच्या मेंटेनन्सकडे लक्ष दिले जात नाही. थातूरमातूर काम करून नादुरुस्त बसेस बिनधास्तपणे रस्त्यावर सोडल्या जात आहे. त्यामुळेच अनेक बसेस ब्रेक डाऊन होतात आणि याचा फटका नाहक प्रवाशांना बसतो. हा वाहक ‘ब्रेक डाऊन’चा बळी ठरल्याची जोरदार चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे प्रवाशांसह एसटी वाहक व चालकांनाही आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.