केंद्र सरकारची अग्निवीरांसाठी मोठी घोषणा
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत लष्कर, नौदल, हवाई दलात तरुणांना ४ वर्षे सेवा देता येईल. ४ वर्षांची सेवा देणाऱ्या अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये प्राधान्य दिलं जाईल. केंद्रीय गृह मंत्रालयानं ही घोषणा केली आहे.
योगी आदित्यनाथ सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा
उत्तर प्रदेश पोलीस दल आणि संबंधित सेवांमध्ये भरती करताना अग्निवीरांना प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या संदर्भात योगींनी एक ट्विट केलं आहे. तरुणांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी भाजपचं डबल इंजिन सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मध्य प्रदेशातही अग्निवीरांना प्राधान्य
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत सेवा देणाऱ्या अग्निवीरांना मध्य प्रदेश पोलीस दलाच्या भरतीत प्राधान्य दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. चौहान यांनी अग्निपथ योजनेचं स्वागत केलं आहे.
उत्तराखंड सरकारची महत्त्वाची घोषणा
अग्निवीरांना राज्य पोलीस भरतीत प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे. अग्निवीरांनी चार वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांना उत्तराखंड पोलीस आणि संबंधित सेवांमध्ये प्राधान्य दिलं जाईल, असं धामी म्हणाले.
हरयाणातही अग्निवीरांना प्राधान्य मिळणार
हरयाणा सरकारनंदेखील अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देणार असल्याची घोषणा केली आहे. चार वर्षांनंतर सेवा दिल्यानंतर ज्या ७५ टक्के तरुणांना लष्करात पुढे संधी मिळणार नाही, त्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य दिलं जाईल, असं मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं आहे.