२० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे ५ तर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात आहेत. तत्पूर्वी अर्ज माघारीच्या दिवशी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. सदाभाऊंनी अर्ज मागे घेतला, त्याक्षणापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील वाटचालीविषयी चर्चा होतीये.
छाटले जरी पंख माझे, लढेन नव्या उमेदीने, सदाभाऊंचा हुंकार
विधान परिषदेचा अर्ज मागे घेतल्यानंतर सदाभाऊंनी फार विचार न करता मुंबई सोडली. ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. दोन दिवसांपूर्वी माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील कोंढार पट्ट्यात अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी, डाळींब, आंबा, मका व इतर फळबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तिथला शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात सापडला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आ. सदाभाऊ खोत यांनी रात्रीच्या अंधारात नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.
तत्पूर्वी त्यांनी आज ट्विटरवरुन गझलकार सुरेश भट यांच्या गझलेचा आधार घेऊन आपल्या राजकीय वाटचालीची दिशा त्यांनी स्पष्ट केली. विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… असं म्हणत पुन्हा गरुडभरारी घेण्याचा आशावाद सदाभाऊंनी व्यक्त केलाय.