नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार ठरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला १७ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. विरोधक सहमतीनं एक उमेदवार निश्चित करतील, अशी माहिती या बैठकीनंतर देण्यात आली. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

एनडीएच्या उमेदवाराविरोधात विरोधकांनी सहमतीनं एक उमेदवार द्यायचा, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. पवारांनीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, असा आग्रह बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांनी धरला. मात्र पवारांनी त्यास नकार दिला. ममता बॅनर्जींनी ही माहिती दिली.
विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक संपल्यानंतर शरद पवारांनी दोन ट्विट केली आहेत. आज झालेल्या बैठकीत काय झालं, याची माहिती पवारांनी दिली आहे. ‘राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी माझं नाव सुचवल. त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव मी नम्रपणे नाकारला,’ असं पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी सेवा देण्याचं माझं काम सुरूच राहील, असं पवारांनी पुढच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.


ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

शरद पवारच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असावेत, असा आग्रह बहुतांश विरोधी पक्षांनी धरला होता. त्यांनी तयारी दर्शवल्यास सगळेच त्यांना पाठिंबा देतील. मात्र ते यासाठी तयार नसल्यास त्यांच्याच अध्यक्षतेखाली उमेदवार निवडला जाईल, असं ममता बॅनर्जी बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या. शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, अशी ममता यांची इच्छा आहे. दिल्लीत येण्यापूर्वी मुंबईत काल ममता यांनी पवारांची भेट घेतली होती. मात्र आपल्याला सक्रिय राजकारणात राहायचं असल्याचं म्हणत पवारांनी ममतांचा प्रस्ताव नाकारला.
शरद पवारांनी नकार दिल्यास उमेदवार कोण? विरोधकांच्या बैठकीत शिवसेनेनं प्रस्ताव मांडला
बैठकीला कोणकोणते पक्ष उपस्थित होते?
ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, आरजेडी आणि डाव्या पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. शिवसेना, नॅशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी, झेडएमएम, जेडीएसचे नेते हजर होते.

कोणकोणते पक्ष अनुपस्थित?
दिल्ली, पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा एकही नेता बैठकीला नव्हता. ओदिशातील सत्ताधारी बिजू जनता दल, तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायआरएस काँग्रेस या पक्षांचे प्रतिनिधी बैठकीला नव्हते. शिरोमणी अकाली दल, बसप, एमआयएम आणि टीडीपीचे नेतेदेखील बैठकीला हजर नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here