आपण भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील संभाव्य राजकीय आघाडीचे एकमुखी नेतृत्व करावे, अशी महत्त्वाकांक्षा असणारे अनेक नेते आहेत. बंगालच्या निवडणुका एकहाती जिंकल्यानंतर ममतांनी दिल्लीवर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे, राजधानीतील या बैठकीकडे दुर्लक्ष करणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पुढच्या महिन्यात ‘राष्ट्रीय पक्ष’ स्थापन करण्याची तयारी करीत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि पंजाबमधील विजयामुळे स्वत:चे स्थान मजबूत करणारे अरविंद केजरीवाल यांना कधी ना कधी स्वत:लाच पंतप्रधान व्हायचे आहे. तेव्हा, ते इतर कुणाच्या पालखीला खांदा देतील, ही शक्यता फारच कमी आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक या प्रश्नावर मोदींशी संघर्ष करण्याच्या विचारात नाहीत. पूर्वीही नव्हते. असे चित्र असताना, विरोधकांनी एकत्रित उमेदवार देऊन ही निवडणूक लढवणे, म्हणजे २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काढलेल्या जोर-बैठका आहेत. त्या आवश्यक आहेत; मात्र सत्ताधाऱ्यांचा उमेदवार आजवर हरलेला नाही. सन १९६९मध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला, तेव्हा खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच अपक्ष उमेदवार असणाऱ्या व्ही. व्ही. गिरी यांची पाठराखण केली होती. तेव्हा विरोधकांना ‘नैतिक लढत’ देणारा दुसरा उमेदवार शोधावा लागेल. सन २०१७ मध्ये उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविलेले गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू विरोधकांचे सहमतीचे उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा आहे. गांधी हे उत्तम लेखक, निवृत्त नोकरशहा आणि विचारवंत आहेत. ते एक-दोन दिवसांत आपली भूमिका विरोधकांना सांगणार आहेत.
विरोधकांच्या तंबूत अशा हालचाली चालू असताना, भाजपने संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सर्व पक्षांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. राजनाथ यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलणी केलीही. भाजपचे राज्यसभेतील बळ २०१७च्या तुलनेत काहीसे कमी झाले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात असणारा उमेदवार जिंकून येण्यात काही अडचण येईल, असे दिसत नाही. फक्त त्यांच्या मनात कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आहेत, द्रौपदी मुर्मू आहेत, अरिफ महंमद खान आहेत, की या नावांची चर्चा होत असल्याने त्यांना देशाला आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे, हे लवकर समजायला हवे. पुढच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४मध्ये होतील. तेव्हा राष्ट्रपती भवनात कोण आहे, हे पंतप्रधानांचे कार्यालय असणारा साउथ ब्लॉक कोणाच्या ताब्यात जातो, या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे, निष्ठेबाबत किंचितही शंका असणाऱ्या उमेदवाराच्या नावावर नरेंद्र मोदी कदापि मोहोर उठवणार नाहीत. दुसरीकडे, विरोधकांच्या दृष्टीने हीच सत्तांतराची मोठी संधी असणार आहे. तेव्हा गरज पडल्यास विरोधकांचा सर्वमान्य उमेदवार कोण होऊ शकतो, याची तयारी आत्तापासूनच करणे आवश्यक आहे. ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची बैठक बोलावणे किंवा शरद पवार यांनी या स्पर्धेत उतरण्यास नकार देणे, याकडे या अंगाने पाहावे लागेल. ज्येष्ठ वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले, तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या नावावर एकमत घडवून आणले होते. डॉ. कलाम हे कसे लोकांचे राष्ट्रपती ठरले, हे देशाने नंतर पाहिले. आज भाजप तेव्हापेक्षा किती तरी मजबूत स्थितीत आहे; मात्र देशाच्या चिरकाल स्मरणात राहील, असा गुणी व अभिमान वाटावा असा राष्ट्रपती देण्यासाठी सर्वोच्च नेतृत्वाकडे उदारमनस्कता आणि विशाल दृष्टी लागते. ती आहे का, हे लवकरच समजेल.