म. टा. प्रतिनिधी, मुंबई ः राज्यात आढळून आलेले करोनारुग्ण ओमायक्रॉन उपप्रकाराने बाधित असून करोनाचा नवा प्रकार आढळलेला नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी स्पष्ट केले. राज्यात शाळा सुरू झाल्यामुळे १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते करून घ्यावे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात करोना रुग्णसंख्येत वाढ होत असली, तरी ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यांपर्यंत मर्यादित आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या जनता दरबारात उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या मर्यादित क्षेत्रांत रुग्णवाढ होत आहे. मुंबईचा संक्रमण दर बुधवारी ४० टक्क्यांवर गेल्यामुळे रुग्णवाढीकडे आरोग्य विभाग लक्ष देऊन आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण दोन ते तीन टक्के आहे, असेही टोपे यांनी सांगितले. या रुग्णवाढीमुळे आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला आहे. ‘हर घर दस्तक’ या सूचनेप्रमाणे आशा सेविका आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here