मुंबई: विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूकंपाची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजपकडून महाविकास आघाडीच्या गोटातील आमदारांची फोडाफोडी होण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मविआच्या गोटातील अनेक नाराज आमदार विधानपरिषद निवडणुकीत भाजपला (BJP) मतदान करतील, असा दावा केला आहे. त्यामुळे आता मविआच्या गोटातील धाकधुक वाढली आहे. (Vidhanparishad Election 2022)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस हे अधिक ‘रिचेबल’ आहेत. त्यामुळे मतदारासंघातील विकासकामे वेगाने मार्गी लावणे शक्य होते. याच कारणामुळे मविआतील काही आमदार विधानपरिषदेला भाजपच्या पारड्यात मत टाकतील, असे बावनुकळे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या सरकारवर जनतेचा आणि आमदारांचा अजूनही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्याला न्याय देऊ शकतात, अशी भावना सर्वपक्षीय आमदारांमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस असे मुख्यमंत्री होते की, ते सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत आमदारांच्या भेटीगाठी घ्यायचे. ते कोणालाही परत पाठवायचे नाहीत. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये अगदी उलटा अनुभव येत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याने आमदारांच्या मनात खदखद आहे. ते मतदारसंघात फिरू शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये आमदारांना काहीही मिळाले नाही. विकासही झालेला नाही. त्यामुळे आमदारांना देवेंद्र फडणवीस आपलेसे वाटतात. देवेंद्र फडणवीस सगळ्यांना प्रेमाने सांभाळून घेत असल्यामुळे सर्वपक्षीय आमदारांचा त्यांच्यावर विश्वास आहे, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
‘मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नाहीत; अजितदादांना पहाटे ५ वाजता फोन केल्यावर ७.४५ ला भेटायला बोलावलं’
विधान परिषद मतदानात शिवसेनेची पुन्हा कसोटी

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या दोन दिवस आधीच म्हणजेच १८ जूनला पक्षाच्या सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पवई येथील हॉटेल रिनेसन्समध्ये मुक्कामी बोलावले आहे. याच हॉटेलमधून सर्व आमदार २० जून रोजी विधान भवनात मतदानासाठी जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here