नागपूर: राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपचा चमत्कार दिसेल. भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजपचे नेते परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे. अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यसभेच्या निवडणुकीत गुप्त मतदान नव्हतं. मात्र तरीही आमचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. आता विधान परिषद निवडणुकीत तर गुप्त मतदान होणार आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं.

अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार तीन दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे सगळे उमेदवार विजयी होतील, असं अनेकांना वाटत नव्हतं. मात्र चमत्कार घडला. आता २० जूनला विधान परिषदेतच्या निवडणुकीत आणखी एक चमत्कार पाहायला मिळेल. देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार दाखवतील, असा विश्वास फुकेंनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आमदारांच्या मनात नाराजी आहे. २० तारखेला होणाऱ्या निवडणुकीत हीच नाराजी दिसून येईल. राज्यसभा निवडणुकीत गुप्त मतदान नव्हतं. मात्र विधान परिषदेसाठी गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे अनेक नाराज आमदार भाजपच्या बाजूनं मतदान करतील, असा दावा फुकेंनी केला. सध्या भाजपच्या आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये असून इतर अपक्षांना आपल्या बाजूनं खेचण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
अजित पवार भाषणापासून वंचित? चंद्रकांत पाटलांनी सांगितलं नेमकं काय घडलं
मुख्यमंत्र्यांवर सर्वच पक्षातील आमदार नाराज आहेत. याचा परिणाम २० जूनला दिसेल, असं फुके म्हणाले. अपक्ष आणि इतर पक्षांतील आमदारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी फुके यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पाच उमेदवार निवडून आणणं कठीण काम आहे. पण नाराज आमदार आणि अपक्षांच्या मदतीनं पाच उमेदवार निवडून येतील, असं फुकेंनी सांगितलं.

मुख्यमंत्री ठाकरे ऍक्शन मोडमध्ये
राज्यसभा निवडणुकीत सत्ता आणि संख्याबळ असूनही पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विधानपरिषद निवडणुकीसाठी अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस रंगणार आहे. ही जागा भाजपने जिंकल्यास अपक्ष आमदार आणि लहान पक्षांवर देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होईल. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला मारक ठरू शकते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानपरिषद निवडणुकीत बाजी मारण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, देवेंद्र फडणवीसांना शह देण्यासाठी वर्षावरील बैठकीत प्लॅन आखणार
या बैठकीला महाआघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. विधानपरिषेदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना हाताशी धरून मतांची जुळवाजुळव कशाप्रकारे करायची याची रणनीती आज वर्षा बंगल्यावरही बैठकीत आखली जाईल. त्यामुळे या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोणत्या सूचना देतात, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here