सध्या मान्सून पेरणी हंगाम सुरु झाला, त्यात बाजारात मोठ्या प्रमाणात प्रमुख खत उत्पादनाचा तुडवडा निर्माण झाला. या संधीचा फायदा घेत अकोल्यात एकाने बनावट खत तयार करण्याचा कारखाना उभा केला असून या कारखान्यामधून बनावट खत बनवून बाजारात विक्री केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक केली जातं आहे. अशी माहिती अकोल्याचे पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गठित केले सोबतचं जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने अकोल्यातील एमआयडीसी फेज ४ मध्ये सुरु असलेल्या भंगार गोदामात छापा टाकला. यादरम्यान, राहुल नामदेव सरोदे (वय ३५ वर्षे रा. नगर परिषद कॉलणी गौरक्षण रोड, अकोला.) हा अवैधरित्या बनावट खताचे उत्पादन करताना मिळून आला.
कारखान्यातून असा केला साठा जप्त
डी.ए.पी. खत, आयपीएल-डीएपी खत, महाधन १८:४६:० असा नामवंत खतांचे पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे नवीन प्लास्टीक बारदाना, पँकिंग मशीन, बनावट रासायनिक खताचा माल, किटकनाशक बॉटल, बनावट हायब्रीड सुमो ग्रानुल्स्, सोडीयम सल्फेट’चा कच्चा माल, इमलसीफायर लिक्वीड, खत बनविण्यासाठी वापरले जाणारे मिक्सर मशीन, निम सीड्स कर्नल ऑईल असा एकत्रित २० लाख ५ हजार ७३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अशा प्रकारे झाली कारवाई
सध्या खरीप हंगाम पेरणीचा कालावधीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा तुटवडा असताना बाजारात विक्रीकरीता बनावट खत तयार करण्याचे साहित्य राहुल सरोदे याच्याकडून मिळून आले, त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकोला येथे कलम ४२० भा.द.वि. सह कलम ७, १९, २१ खत नियंत्रण आदेश १९८५, कलम ३,९ अत्यावश्यक वस्तू कायदा १९६८, कलम ९.३ किटकनाशक नियम १९७१ कलम ४,६, ९, १०, १५ किटकनाशक आदेश १९८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.