मुंबई : भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केलेली असून ‘मिशन ४५’ जिंकण्याचा निर्धार केला आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासाठी भाजपने प्लॅनिंग केलं आहे. त्यानुसार १६ मतदारसंघात पक्ष संघटना वाढविण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या १६ लोकसभा मतदारसंघाच्या जबाबदाऱ्याही प्रभारी तथा प्रमुख नेत्यांवर देण्यात आल्या आहेत. या सगळ्यात अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे कर्जतच्या राम शिंदे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. फडणवीसांनी आठवड्याभरापूर्वीच विधान परिषदेची उमेदवारी देऊन राम शिंदे यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे. आता पुन्हा लोकसभेच्या ‘मिशन ४५’ च्या अनुषंगाने फडणवीसांनी राम शिंदेकडे बारामतीची जबाबदारी देऊन नवा डाव टाकला आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या तयारी आणि रणनिती ठरविण्यासाठी आज राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष विनोद तावडे उपस्थित होते. महाराष्ट्रातून लोकसभेचं ‘मिशन ४५’ गाठण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्या जागा जिंकल्या त्यावर लक्ष राहणारच आहे, त्याशिवाय जिथे उमेदवार निवडून येऊ शकतो, अशा जागांवर भाजप ताकद लावणार आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासाठी भाजपने प्लॅनिंग केलं आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या ताब्यातील बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने राम शिंदेंवर प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.

बारामती-मावळ-साताऱ्यात ताकद वाढवा, लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या, प्लॅनिंग ठरलं : फडणवीस
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे गेली तीन टर्म सलग खासदार म्हणून निवडून आल्या. सुप्रिया सुळे यांनी २००९ लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन त्यानंतरच्या २०१४ आणि २०१९ च्या मोदी लाटेतही विजयी झेंडा रोवला. गेल्या लोकसभा निवडणुकीत तर भाजप नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न करुनही भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या पदरी निराशा पडली. राष्ट्रवादीतून आलेल्या राहुल कुल यांच्या पत्नीला भाजपने लोकसभेची उमेदवारी देऊन सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मैदानात उतरवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी-गृहमंत्री अमित शाह-जेपी, केंद्रीय मंत्री, राज्य भाजपचे नेते यांनीही बारामतीत सभा घेतल्या. पण बारामतीची जागा निवडून आणण्यात भाजपला यश आलं नाही. परंतु निराश होण्यासारखं देखील काही घडलं नव्हतं. कारण सुप्रिया सुळे यांना भाजपने तगडी टक्कर दिली होती. ७४ हजार मतांनी भाजपने जागा गमावली. पण यावेळी मात्र भाजपने काहीही करुन पवारांच्या बारामतीच्या गडाला सुरुंग लावायचं नियोजन केलं आहे. त्यानुसार दोन वर्षांआधी प्लॅनिंगही केलं आहे.

राम शिंदे यांच्याकडे बारामती लोकसभेचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याअंतर्गत त्यांना बारामती मतदारसंघातल्या सहा तालुक्यांमध्ये फिरुन केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्यास सांगितलं आहे. शिवाय वेळोवेळी मतदारसंघातील दौरे, जनतेच्या भेटीगाठी, सभा-संमेलनं असा तगडा कार्यक्रम राम शिंदेंना आखण्याचं भाजपने सुचवलं आहे. शिवाय राम शिंदे धनगर समाजातून येत असल्याने आणि बारामती मतदारसंघात धनगर समाजाची मतं जास्त असल्याने त्याचाही मोठा फरक पडणार आहे. असे सगळे आडाखे आखून फडणवीसांनी फासे टाकले आहेत.

कर्जत जामखेडमधून राम शिंदे-रोहित पवार यांच्यात २०१९ ला तगडी फाईट झाली. या निवडणुकीत राम शिंदेंना नवख्या रोहित पवारांनी आस्मान दाखवलं. पराभवापासून राम शिंदे काहीसे अडगळीत पडल्याचं चित्र होतं. मात्र फडणवीसांनी आठवड्याभरापूर्वीच विधान परिषदेची उमेदवारी देऊन राम शिंदे यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे. आता पुन्हा लोकसभेच्या मिशन ४५ च्या अनुषंगाने फडणवीसांनी राम शिंदेकडे बारामतीची जबाबदारी देऊन नवा डाव टाकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here