अंधेरी पूर्व मतदारसंघाची जबाबदारी आशिष शेलारांकडे देण्यात आली आहे. याआधी शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपले नेतृत्त्वगुण दाखवून दिले. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला कडवी लढत दिली. शिवसेनेनं ८४ जागा जिंकल्या. तर ८२ प्रभागांमध्ये भाजपला यश मिळालं. विशेष म्हणजे शेलार यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या जागा ३१ वरून ८२ वर गेल्या. त्यामुळेच आता भाजपनं अंधेरी पूर्वची जबाबदारी शेलारांकडे दिली आहे.
अंधेरी पूर्वेत शिवसेना वि. भाजप सामना रंगेल. २०१४ आणि २०१९ मध्ये या ठिकाणी रमेश लटके विजयी झाले. २०१४ मध्ये रमेश लटके यांनी भाजपच्या सुनील यादव यांचा ५ हजार मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये सेना-भाजपची युती होती. त्यावेळी लटके यांनी अपक्ष आमदार मुरजी पटेल यांचा जवळपास १७ हजार मतांनी धुव्वा उडवला. पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. आता भाजप त्यांनाच या मतदारसंघातून तिकीट देण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जबाबदारीदेखील शेलारांवर
भाजपनं लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मिशन ४५ हाती घेतलं आहे. नव्या मिशननुसार सगळं प्लानिंग झाल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ज्या जागा जिंकल्या आहेत, त्यावर आमचं लक्ष आहेच. मात्र ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
भाजपनं राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. या १६ मतदारसंघांसाठी १६ प्रभारींची नेमणूक केली आहे. यात शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या १० मतदारसंघांचा समावेश आहे. पैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची जबाबदारी आशिष शेलारांकडे असेल. सध्या या ठिकाणी शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची काम शेलारांना करावं लागेल.
कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या निलेश राणेंनी यश मिळवलं. मात्र त्यानंतर २०१४, २०१९ मध्ये या मतदारसंघात राणेंना पराभव पत्करावा लागला. २०१४ मध्ये राऊतांनी निलेश राणेंचा दीड लाख मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये राऊतांनी राणेंना जवळपास पावणे दोन लाख मतांनी धूळ चारली. यानंतर निलेश राणे भाजपमध्ये आले. त्यांचे वडील नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. नारायण राणेंना मंत्रिपद देऊन भाजपनं त्यांच्या मागे ताकद उभी केली आहे. याच ताकदीचा वापर करून सेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचं आव्हान शेलारांसमोर असेल.