नागपूर: नागपुरात रॉयल ड्रिंक्स या वर्धमाननगर येथील मद्य कारखान्याला बनविण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यांनी चक्क दारूच्या बॉटल्समध्येच सॅनिटायझर भरून विकले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. काही मद्यपींनी याचे मद्य समजून सेवन केले असल्याचे पुढे आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. अन्न व औषध प्रशासनाने उर्वरित साठा विक्रीवर प्रतिबंध घातला असून मार्केटमधील साठा परत बोलाविण्यासाठी संबंधित कारखाना मालकाला निर्देश दिले. सॅनिटायझरचे नमुने तपासणीसाठी पठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा तुडवडा लक्षात घेता शासनाने मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली. वर्धमाननगर येथील प्रमोद जयस्वाल यांच्या रॉयल ड्रिंक्स या कारखान्याला परवानगी मिळाल्याने त्यांनी सॅनिटायझर निर्मितीला सुरूवात केली. मात्र त्यांनी सॅनिटायझर बनिवताना सुरक्षेच्या नियमांचे पालनच केले नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. इतर सॅनिटायझरच्या बॉटल्सप्रमाणे सॅनिटायझर बनविण्याची गरज होती. मात्र चक्क दारूच्या बॉटल्समध्येच सॅनिटायझर भरण्यात आले. त्यावर दारूच्या बाटली सारखे झाकणही असल्याने नेमकी दारूची बाटली की सॅनिटायझर हे ओळखणे कठीण होत आहे. या बॉटल्स आता बाजारातही गेल्या असल्याने नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने याची गंभीर दखल घेत उर्वरित साठा विकण्यासाठी प्रतिबंधित केले असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रभारी सहआयुक्त प्रकाश शेंडे यांनी सांगितले.

नागरिकांनो, पिऊ नका…!

कोणकोणत्या भागात हा सॅनिटायझरचा माल विकण्यात आला याचा शोध प्रशासनाकडूनही घेतला जात आहे. रॉयल ड्रिंक्सच्या बाटल्या तुम्हाला कुठे आढळून आल्या तर त्या पिऊ नका, आरोग्यासाठी घातक असू शकतात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या या बॉटल्सचे पॅकींग सॅनिटायझर सारखे नाही, त्यामुळे मद्य समजून पिण्याचा धोका वाढला आहे. मद्य समजून सॅनिटायझर पिल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकते असा इशाराही देण्यात आला आहे. ९० आणि १८० मिलिलिटरच्या बाटल्या बनविण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सतीश चव्हाण यांनी सांगितले.

तपासणीसाठी पाठविले नमुने

बाटलीतील सॅनिटायझरचे ३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या तपासणीच्या अहवालानंतर अधिक माहिती पुढे येईल. सॅनिटायझरच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे शेंडे यांनी सांगितले. दरम्यान, शांतिनगर आणि नंदनवर येथे दारू समजून काही जण हे सॅनिटायझर पिल्याची माहितीही पुढे आली असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here