मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. यादरम्यान, सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता १८ जून २०२२ पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत राज्यात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी देखील मुसळधार ते अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टीही अपेक्षित आहे. मध्यंतरी मान्सूनचा वेग मंदावला होता. आता मात्र मान्सूनने चांगलीच गती घेतली आहे.
राज्यात मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच, शेतीकामांनाही वेग आला आहे. खरंतर, रविवारनंतर राज्यात पावसाने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता पाऊस पुन्हा सक्रीय होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.