म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांना पुन्हा हॉटेलमध्ये नजरेच्या टप्प्यात ठेवण्यात येणार आहे. अनेक पक्षांनी यावेळी हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे येत असतानाच, काँग्रेसनेसुद्धा नव्या हॉटेलाची चाचपणी सुरू केली असल्याचे समजते. विधान परिषदेसाठी पवईतील हॉटेलला पसंती न देता यंदा दक्षिण मुंबईत आमदारांसाठी हॉटेलची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारपासून आमदारांच्या हॉटेलमधील मुक्कामास सुरुवात होणार असल्याची माहितीही यानिमित्ताने पुढे आली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसल्यानंतर तिन्ही पक्षांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने पक्षांकडून आपल्या आमदारांना नजरेच्या टप्प्यात ठेवण्यासाठी तयारी सुरू आहे. काही पक्षांनी राज्यसभेच्या वेळेस ज्या हॉटेलात आमदारांना ठेवले होते, त्याच हॉटेलची विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही निवड केल्याचे कळते. मात्र काहींनी यावेळी दुसऱ्या हॉटेलची चाचपणी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसचा समावेश असल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान पवई येथील एका पंचतारांकित हॉटेलात मुक्कामास असलेल्या आमदारांनी पुन्हा याच हॉटेलात राहण्यास नकार दिल्याने पक्षाने दक्षिण मुंबईत नव्या हॉटेलची शोधाशोध सुरू केल्याचे समजते.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीदरम्यान पवई येथील एका पंचतारांकित हॉटेलामध्ये वास्तव्यास असलेल्या आमदारांना निवडणुकीच्या बैठका आणि इतर नियोजनासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती. विधान भवनात होणाऱ्या या निवडणुकीसाठी पुन्हा पवईतील हॉटेलची निवड केल्यास त्याचा फटका नियोजनावर बसू शकतो. त्यामुळे अनेक आमदारांनीही येथील हॉटेलांबाबत नकार दिल्याचे कळते. लवकरच पक्षाकडून दक्षिण मुंबई आणि आसपासचे हॉटेल निश्चित करून आमदारांना कळविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here