तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याकडून शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना फोन करण्यात आले आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या संबंधित नेत्याकडून विधानपरिषद निवडणुकीत आमदारांकडे पाठिंब्याची मागणी करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता आपल्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकवून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या गोटातील आमदारांनाही गळाला लावू पाहत असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्याला शिवसेनेचा होकार आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसे नसल्यास ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कितपत रुचणार, हे पाहावे लागेल.
यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत ऐन क्षणाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारासाठीचा मतांचा कोटा अचानक वाढवला होता. त्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची मिळणारी मते घटली होती. त्यानंतर मतदानावेळीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी दोन दिवस प्रशिक्षण देऊनही तांत्रिक घोळ घातला होता. या सगळ्या प्रकाराविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाकडे नाराजीही व्यक्त केली होती.
विधान परिषदेला खडसे, पाडवींचा गेम होणार
राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही महाविकास आघाडीला जोरदार झटका देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. हा झटका काँग्रेसच्या भाई जगताप यांना बसण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमशा पाडवी यांनाच भाजपकडून टार्गेट केले जाण्याची शक्यताच अधिक आहे.
भाजप काहीही करून एकनाथ खडसे यांच्या विरोधात मोठा सापळा रचणार, तसेच शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी पाडवी यांच्यामागेही भाजप लागणार, असे त्यांचे नेते खासगीत सांगत आहेत. आमशा पाडवी हे आदिवासी समाजातील असून, त्यांचा आमदारांशी फारसा संपर्कही नाही. हीच बाब भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.