‘मला त्रास देण्यामागे पवारांचा हात’
एसटी कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर पैसे वसुली प्रकरणात अकोट शहर पोलिसांनी गुरुवारी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री यांची गुरुवारी साडेतीन तास चौकशी केली. अकोट पोलिसांनी ११ एप्रिलला सदावर्ते दाम्पत्यासह अजय गुजर आणि प्रफुल्ल गावंडे अशा चौघांवर गुन्हे दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मला त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामागे शरद पवार यांचा हात आहे, मात्र माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
न्यायालयीन प्रक्रियेच्या खर्चापोटी सुमारे ७४ हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३००-४०० रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते आणि इतर तीन जणांवर आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी यासंदर्भात तक्रार दिली. या आधारावर अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. २१ एप्रिलला अकोट न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला. गुरुवारी सदावर्ते दाम्पत्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले. या दोघांची अकोटचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या कक्षात चौकशी करण्यात आली. भविष्यात चौकशीसाठी आणखी हजर राहावे लागेल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.