‘विदर्भातील लोकांना त्यांचे संवैधानिक हक्क मिळत नाहीत. त्यामुळे वेगळा विदर्भ व्हावा, ही आमची भूमिका आहे. श्रीहरी अणेंसोबत बोलून पुढे चळवळीची दिशा ठरवणार आहोत. त्याचप्रमाणे मुंबई हेदेखील वेगळं राज्य व्हावं. जगात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या शहरांचं नंतर वेगळं राज्य तयार करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मुंबईही छोटं राज्य व्हावं. छोटी राज्य विकासाची केंद्र होतात, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. आम्हीही आता तीच भूमिका मांडत आहोत,’ असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
राजकारण कधी प्रवेश करणार?
गुणरत्न सदावर्ते हे वारंवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या विविध नेत्यांना लक्ष्य करत असतात. त्यामुळे सदावर्तेंची राजकारणात एण्ट्री कधी होणार, अशी चर्चा सुरू असते. या प्रश्नाचं उत्तर खुद्द सदावर्तेंनीच दिलं आहे. ‘आपण राष्ट्राला मोठं करण्याचं काम करत आहोत. योग्य वेळी राजकारणात एण्ट्री करणार आहे. कारण राजकारण समाजसेवेचं मोठं माध्यम आहे,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकर यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ‘आमदार मिटकरी यांचं भजन-कीर्तन आता ऐकायला मिळत नाही. खूप बोलणारे मिटकरी विदर्भ आणि ओबींसींच्या प्रश्नावर बोलत नसल्यानं त्यांचं पितळ उघडं पडलं,’ अशा शब्दांत सदावर्ते यांनी निशाणा साधला आहे.