विधानपरिषद निवडणुकीत पसंतीच्या क्रमांनुसार मतदान होते. त्यामुळे एखाद्या आमदाराने पहिल्या पसंतीचे मत आपल्या पक्षाला दिल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचं मत कोणाला द्यायचं, हे त्याच्यावर अवलंबून असतं. अशावेळी एखाद्या राजकीय पक्षाने आमदाराला दुसऱ्या पसंतीच्या मतासाठी फोन केला आणि मदत मागितली, तर त्यामध्ये वाईट काय आहे? तसेच निवडणुकीच्या काळात आमदारांची फोडाफोडी ही होतच असते. किंबहुना फोडाफोडीशिवाय राजकारण होऊच शकत नाही. त्यामध्ये नवीन काय आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.
विहीर म्हटलं की त्यामध्ये पाणीच असणार. विहीरीला पेट्रोल किंवा घासलेट लागलं तर तो आश्चर्याचा विषय ठरू शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात फोडाफोडी ही क्रमप्राप्त आहे. आमचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असता तर आम्हीही मतांसाठी फोडाफोडी केली असती. कोणताही आमदार त्याला विधानपरिषदेच्या मतांसाठी कोणत्या राजकीय पक्षाचे फोन आले, हे सांगणार नाही. आम्हाला इतर राजकीय पक्षांचा फोन आला म्हणजे आम्ही त्यांना मतदान करूच असे नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.
महाविकास आघाडीत परस्परांच्या आमदारांची फोडाफोडी?
विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यासाठी शिवसेनेच्या गोटातील आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत परस्परांचे आमदार फोडले जाण्याचा खेळ रंगू शकतो. तसे घडल्यास महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या गोष्टीचे समर्थन केले आहे. निवडणुकीत सगळ्या पक्षांच्या आमदारांशी संपर्क साधला जातोच. त्यामध्ये काहीही चूक नाही, अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली.