मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे मतदान जवळ आल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेला समर्थन करणाऱ्या अपक्ष आमदारांना अजित पवार यांनी संपर्क साधल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून महाविकास आघाडीतच आमदारांची पळवापळवी सुरू आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, ‘प्रत्येक पक्ष आपआपल्या आमदारांची काळजी घेईल आणि ती घ्यावीच लागेल.’

राजकारणात फोडाफोडी होतच असते, बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

काँग्रेस नेते अजित पवारांच्या भेटीला

राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीतही अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. या भेटीत तिन्ही नेत्यांमध्ये विधानपरिषद निवडणुकीबाबत खलबतं झाली असून अपक्षांना खेचण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, २० जून रोजी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. या १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्याने निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडी आपली ताकद दाखवून देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here