सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणानंतर पुणे जिल्ह्यातील दोन गुन्हेगार अचानक पोलिसांच्या रडारवर आले होते. पोलिसांनी देखील अत्यंत शिताफीने दोघांनाही अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे हे दोन्ही गुन्हेगार अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात असल्याचं समोर आले. सौरभ महाकाळ याने वयाच्या १० व्या वर्षीच एका नातेवाईकाचा मोबाईल चार्जर चोरला होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला घरातून हाकलूनही दिले होते. तसंच संतोष जाधव याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपल्यानंतर वाईट मित्रांच्या संगतीत राहून त्याची पावले गुन्हेगारीकडे वळली.
कौटुंबिक पार्श्वभूमी
संतोष जाधव याला वडील नाहीत आणि सौरभ महाकाळ याला आई नाही. सौरभ महाकाळच्या आईने घरगुती वादातून स्वतःला पेटवून घेतले होते. त्यावेळी सौरभ अवघ्या १० वर्षांचा होता. आता त्याचे वय १९ इतके आहे. सौरभचे वडील वाहनचालक असून पत्नी गेल्यानंतर ते व्यसनाच्या आहारी गेले. त्यामुळे सौरभकडे लक्ष देण्यासाठी कुणी नसल्याने तो या गुन्हेगारीकडे वळल्याचे सांगितले जाते. तर संतोष याच्या वडिलांचे निधन कशाने झाले याची माहिती समोर आलेली नाही. या दोन्ही गुन्हेगारांना ते राहात असलेल्या भागात दहशत निर्माण केली होती.
जुन्नर, आंबेगाव तालुक्यात आणखी संपर्कात
सौरभ महाकाळचे लहानपण जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात गेले आहे. त्याचे शिक्षण सातवीच्या आसपास झाल्याची माहिती समोर आली आहे. जुन्नर तालुक्यात त्याचे अनेक नातेवाईक राहत असून त्याचे त्यांच्याकडे येणे जाणे होते. सौरभ सुरुवातीपासूनच गुन्हेगारी वृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे. मंचर येथील बाणखेले खून प्रकारणानंतर संतोष आणि सौरभ एकत्र आल्याचे बोलले जात आहे. संतोष जाधव याचंही शिक्षण फार झालेलं नसून तो आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक अल्पवयीन मुलांच्या संपर्कात आहे.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ या दोन अल्पवयीन गुन्हेगारांमुळे अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अल्पवयीन तरुणांना गुन्हेगारीकडे जाण्यापासून रोखायचे असल्यास पालकांनी आपल्या पाल्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आपल्या मुलाचे मित्र कुठले आहेत, कुठल्या पार्श्वभूमीचे आहेत, हे पालकांना माहीत असणं गरजेचं आहे.