Congress Agitation : राज्यभरात आज काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींची ईडीनं चौकशी केली आहे. या चौकशीच्या  विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रात आज जवळपास सर्वच जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याचे देखील पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. तसेच काँग्रेसच्या आंदोलकांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 

राज्यात कुठे कुठे झालं आंदोलन

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्या आलं. राज्यातील अहमदनग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, वाशिम या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

नाशिक

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेधाचे फलक घेत आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

केंद्र सरकार विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सूडबुद्धीनं करण्यात येत आहे. हा गैरवापर तत्काळ थांबवावा अशी मागणी करत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधींच्या पुतळ्यास समोर धरणे आंदोलन सुरु केलं. 

पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
काँग्रेसनं जिल्हाधिकारी कर्यालयासमोर आंदोलन केलं. राहुल गांधी यांची चौकशी सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसनं केला आहे. राहुल गांधी यांनी सरकार विरोधात आवाज उठवला म्हणून कारवाई केल्याचा काँग्रेसनं आरोप केला आहे.

हिंगोली 

हिंगोलीतही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आमदार प्रज्ञा  सातव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॉग्रेसच्या आंदोलनात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.  आंदोलन चिघळल्याने आंदोलकांनी काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

आंदोलन व पोलिसांचा बसला दे धक्का

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेमध्ये पोलीस आणि आंदोलकांना बसला दे धक्का देण्याची वेळ आली. संगमनेरमध्ये आज बसस्थानकासमोर केंद्र सरकार विरोधात काँग्रेसनं धरणे आंदोलन सुरु केल असताना परिवहन महामंडळाची बस अचानक बंद पडली. बराच वेळ प्रयत्न करुनही बस सुरु होवू शकली नाही. बस बंद पडल्यानं नाशिक –पुणे महामार्गावर ट्राफीक जाम झाली होती. अखेर आंदोलक आणि पोलिसांनी बसला धक्का मारत जवळच असलेल्या स्टॅण्डमध्ये बस नेली.

परभणीत काँग्रेसचा रास्ता रोको 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सुरु असलेली ईडीची कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत या कारवाई विरोधात परभणीत काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्ग काँग्रेसच्या आंदोलकांनी अडवला होता. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

औरंगाबादेत काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर  ईडीमार्फत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चौकशीच्या कारवाई विरोधामध्ये औरंगाबादेत काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलया समोर आंदोलन सुरु केलं. काँगेस पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या कारवाई विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने सुरु केली आहेत. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांवर मोदी सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. 

चंद्रपूरमध्ये आंदोलन 

चंद्रपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. गांधी कुटुंबाला ईडीच्या माध्यमातून नाहक त्रास दिल्या जात असल्याचा आरोप धानोरकर यांनी केला.

धुळ्यात धरणे आंदोलन 

राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धुळ्यात शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर शहरातील मोठ्या पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नागपूरमध्ये पोलीस आंदोलक आमने सामने

काँग्रेस नेते राहुल गांधींची ईडीनं चौकशी केली आहे. या चौकशीच्या  विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज नागपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपविरोधी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी काँग्रेसच्या आंदोलकांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सवरुन पुढे जाण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची सलग तीन दिवस जवळपास 30 तास चौकशी करण्यात आली. पुन्हा एकदा ईडीने (ED) त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तर दुसरीकडे देशातील कॉंग्रेस पक्ष त्याविरोधात प्रचंड संतापला असून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा सत्याग्रह दडपण्यासाठी दिल्ली पोलिस केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तीन दिवसांच्या चौकशीदरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यांची विधाने ए 4 आकाराच्या कागदावर टाईप केली जात आहेत. तसेच त्यावर मिनिट-मिनिटावर स्वाक्षरी केली जात आहे आणि नंतर तपास अधिकाऱ्यांकडे सोपवली जातात. पीटीआय या वृत्तसंस्थेने तपास एजन्सीच्या सूत्रांचा हवाला देत सांगितले की, राहुल गांधी यांची एजेएलच्या मालकीच्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबत आणि ‘यंग इंडियन’ ही ना-नफा कंपनी भाडेतत्त्वावर घेण्याच्या व्यावसायिक हालचाली कशा करत होती याबद्दल चौकशी केली जात आहे. त्याची जमीन आणि इमारती. या प्रकरणी एफआयआर नसल्याचा काँग्रेसचा दावा आहे. तसेच हा ‘अनुसूचित अपराध’नाही, ज्याच्या आधारावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याचा (पीएमएलए) गुन्हा नोंदवला जावा आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here