यावेळी संजय राऊत यांनी विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या गोटातील आमदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांचे आमदार फोडतील, असेही बोलले जात आहे. मात्र, संजय राऊत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. असं काहीही नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अपक्ष आमदारांशी संपर्क साधला जात आहे. निवडणुकीच्या काळात सगळे एकमेकांशी चर्चा करतच असतात. शेवटी महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री सगळ्यांना एकत्र बसवून निर्णय घेतील, असे राऊत यांनी म्हटले.
विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्यक्ष पक्ष आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांचे आमदार फोडत आहेत, हा गैरसमज आणि चुकीचा प्रकार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र भुयार नेमकं काय म्हणाले?
विधानपरिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभूत झाला तर तो अपक्षांनीच पाडला, असे संजय राऊत त्यादिवशी १०० टक्के बोलतील. या गोष्टीची जाणीव मला आहे. त्यामुळे मी एकचं ठरवलंय की, मी परवाच्या बैठकीत महाविकास आघाडीसमोर एक प्रस्ताव मांडणार आहे. त्यानुसार विधानपरिषद निवडणुकीसाठी मी मतदान करायला जाईन तेव्हा संजय राऊत यांना माझ्यासोबत पाठवावे. मी मतदान करताना संजय राऊत माझ्या टेबलाच्या समोर उभे राहतील. मी त्यांना मत दाखवून मतपेटीत टाकेन, असा प्रस्ताव देवेंद्र भुयार यांनी मांडला आहे. हे शक्य नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे विधानपरिषदेत मतदाना करण्याचा माझा अधिकार संजय राऊत यांनाच देऊन टाकावा. ते त्यांच्याच हाताने मतपेटीत मत टाकतील, असेही भुयार यांनी म्हटले.