मुंबई: स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २०२१ मध्ये भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकांमधील पैसा ५० टक्क्यांनी वाढला. स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा १४ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. स्विस बँकांमध्ये भारतीयांचे ३.८३ अब्ज स्विस फ्रँक आहेत. भारतीय चलनात हा आकडा ३० हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक होतो. यामध्ये स्विस बँकांच्या शाखा आणि अन्य वित्तीय संस्थांमध्ये असलेल्या पैशांचा समावेश आहे.

स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेनं गुरुवारी वार्षिक आकडेवारी जाहीर केली. स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा वाढल्याचं या आकडेवारीतून अधोरेखित झालं. २०२० च्या अखेरीस स्विस बँकेत भारतीयांचे २.५५ अब्ज स्विस फ्रँक होते. त्यात आता ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय भारतीय ग्राहकांची बचत खात्यातील रक्कम दोन वर्षांच्या घसरणीनंतर २०२१ मध्ये जवळपास ४ हजार ८०० कोटी रुपयांवर पोहोचली. हा ७ वर्षांतला उच्चांक आहे.
Agneepath Scheme: आता उरले फक्त २ दिवस! अग्निपथ योजनेबद्दल लष्करानं दिली महत्त्वाची अपडेट
स्विस बँकेची आकडेवारी काळा पैसा दाखवते?
स्वित्झर्लंडच्या बँकांच्या वतीनं एसएनबीनं आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. स्विस बँकेत बाँड्स आणि अन्य माध्यमातून जवळपास १६ हजार कोटी रुपये जमा आहेत. याआधी २००६ मध्ये स्विस बँकेत भारतीयांचे ५२ हजार कोटी रुपये जमा होते. त्यानंतर त्यात घसरण झाली. मात्र २०११, २०१३, २०१७, २०२० आणि २०२१ मध्ये यामध्ये वाढ झाली.

परदेशी ग्राहकांनी स्विस बँकेत ठेवलेल्या पैशांचा विचार केल्यास, ब्रिटिश नागरिक आघाडीवर आहेत. ब्रिटिश नागरिकांचे एकूण ३७९ अब्ज स्विस फ्रँक बँकेत जमा आहेत. ब्रिटननंतर अमेरिकेचा नंबर लागतो. अमेरिकन नागरिकांचे १६८ अब्ज स्विस फ्रँक स्विस बँकांमध्ये जमा आहेत. यानंतर वेस्ट इंडिज, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, हाँगकाँग, बहामास, नेदरलँड, केमन आयलँड आणि सायप्रसचा क्रमांक येतो. या यादीत भारत ४४ व्या स्थानी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here