सिनपा गावात घडलेल्या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. मुलासोबत झालेल्या वादातून वडिलांनी मुलींसह आयुष्य संपवल्याच्या घटनेवर विश्वास ठेवणं अनेकांना जड जात आहे. मात्र मुलासोबतच्या भांडणांनंतर वडिलांनी आत्महत्या केल्याच्या माहितीला अद्याप पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. गुरुवारी सकाळी शेतकरी शंकरा राम यांनी त्यांची विवाहित मुलगी सुआ आणि अल्पवयीन मुलगी धुडीसह घराच्या मागे असलेल्या झाडाला लटकून आत्महत्या केली.
गुरुवारी सकाळी ग्रामस्थांना तिघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आले. ते पाहून सर्वांना धक्काच बसला. घटनास्थळी शेकडो जण जमले. स्थानिक पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे. विवाहितेच्या सासरच्या लोकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
बुधवारी रात्री वडील आणि मुलामध्ये कडाक्याचं भांडण झालं. वडिलांना त्यांच्या मोठ्या मुलीला सासरी पाठवायचं नव्हतं. मात्र मुलगा तिला सासरी पाठवण्याचा आग्रह धरत होता. मुलीचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला असून तिला एक मुलगादेखील आहे. वाद वाढल्यानं पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला. पुन्हा वाद होणार नाही, अशा शब्दांत पिता-पुत्रांनी पोलिसांना आश्वस्त केलं. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी वडिलांनी दोन मुलींसह आत्महत्या केली.
आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी ओमप्रकाश यांनी दिली. मृतदेहांजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. प्रत्येक गोष्टीचा विचार करून आमचा तपास सुरू आहे. आसपास राहणाऱ्या व्यक्तींकडून माहिती घेतली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.