marriage issue: लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडाला बेदम मारहाण; गाडीही फोडली – maharashtra aurangabad crime news mumbai bride beaten the car also broke down
औरंगाबाद : लग्न झाल्यावर नवरी पसंत नसल्याचे नवरदेवाने सांगताच चिडलेल्या वधूच्या नातेवाईकांनी मुंबईच्या वऱ्हाडाला चांगला चोप देत वाहनांची तोडफोड केली आहे. त्यामुळे फुटलेली वाहने घेऊन नवरीवीनाच वऱ्हाड परतलं. त्यानंतर नात्यातील मुलासोबत लग्न पार पडले. ही घटना गांधेली गावात घडली. मारहाणीत वधू पक्षाकडील दोन महिलाही जखमी झाल्या तर दोन जणांची डोकी फुटली आहेत. या वादात गावकऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे ही भांडण तंटा सुटली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाद मिटवले. मिळालेल्या माहितीनुसार याबाबत अधिक माहिती अशी की, लग्न लागले, आलेल्या पाहुण्यांची जेवणं झाली. नवरी विदाईची वेळ आली. वऱ्हाड निघणारच तेवढ्यात नवरदेवाने नवरीच पसंत नसल्याचं सांगितलं. तिला सोबत घेऊन जाणार नाही, असं सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या नवरीच्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडींना बेदम मारहाण केली. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्या.