मुंबई : विधानपरिषद निवडणूक जवळ आल्याने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात उतरल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीत २० जून रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारही मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. अशातच मुंबईत येण्यासाठी निघालेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याबाबत मात्र वेगळाच प्रकार घडला आहे. एसी ट्रेनने मुंबईत येत असताना आमदार जोरगेवार यांचे दोन मोबाईल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वे गाडीत मोबाईल चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलिसांकडे याबाबतची तक्रार दिली आहे. तसंच रेल्वे मंत्र्यांनाही पत्र लिहिलं आहे. जोरगेवार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करण्यात येत आहे.

अडीच वर्षात अपक्षांकडे केलेले दुर्लक्ष डोकेदुखी वाढवणार; महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ

नेमकं काय घडलं?

किशोर जोरगेवार हे एका कामानिमित्त सोलापूर जिल्ह्यात गेले होते. तेथून मुंबईला येण्यासाठी जोरगेवार हे कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाडीत बसले. रात्री झोपताना त्यांनी आपले दोन्ही मोबाईल चार्जिंग करण्यासाठी लावले होते. मात्र सकाळी उठल्यानंतर दोन्हीही मोबाईल गायब झाल्याचं आमदार महोदयांच्या लक्षात आलं आणि एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, रेल्वेच्या एसी डब्यात चोरी होऊ शकते, याचा मला अंदाज नव्हता, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here