तिरुवनंतपूरमः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांनी आपआपल्या सीमा सील केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद आहे. तरीही आपल्या आजारी मुलाला भेटण्यासाठी एका आईने ६ राज्यांच्या सीमा ओलांडत तीन दिवसांमध्ये २७०० किलोमीटर अंतर कापल्याचं समोर आलंय. महिलेने सून आणि नातेवाईकांसोबत कारने हा प्रवास पूर्ण केला.

महिलेचा मुलगा अरुण कुमार (२९) हा बीएसएफमध्ये असून तो राजस्थानमध्ये तैनात आहे. अरुण आजारी असल्याने जोधपूरमधील एम्सच्या डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी फोन करून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर अरुण यांची आई शिलम्मा वासन (वय ५०) अस्वस्थ झाली आणि मुलाला भेटण्यासाठी निघाली. सून आणि काही नातेवाईकांना सोबत घेऊन त्या कारने निघाल्या. केरळमधून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात असा प्रवास करत ते राजस्थानमध्ये पोहोचले.

मुलाच्या प्रकृतीत आता सुधारणा होतेय. कुठल्याही अडचणीशिवाय राजस्थानमध्ये आलो, याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले. शिलम्मा यांच्या मदतीसाठी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलधीरन, मुख्यमंत्री पी. विजयन आणि काँग्रेस नेते ओमन चंडी यांचेही आभार मानले. यामुळे इतर राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक कागदपत्र मिळाली, असं शिलम्मा यांनी सांगितलं.

अरुण कुमार हे गेल्या फेब्रुवारीत घरी गेले होते. जोधपूरला परतल्यावर ते आजारी पडले. त्यांना म्योसिटीस नावाचा आजार आहे. त्यांनी आपली आणि पत्नीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा एक वर्षाच्या मुलगा पत्नीच्या माहेरी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here