व्यावसायिकाच्या हत्येनंतर संपत्तीवरून वाद; पत्नीनंतर दुसऱ्याच महिलेचा वारसदार म्हणून दावा – dispute over property after the murder of businessman sanjay biyani
नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबात आता संपत्तीवरून कलह सुरू झाला आहे. संजय बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी यांनी संपत्तीत वारसदार असल्याचा दावा केल्यानंतर आता आणखी एका महिलेने संपत्तीत हक्क सांगितला आहे. मी आणि माझी चार वर्षांची मुलगी संजय बियाणी यांच्या संपत्तीची वारसदार असल्याचा दावा या महिलेने केला आहे.
बियाणी यांच्या संपत्तीवर दावा करणाऱ्या महिलेने न्यायालयात तसा अर्जही दाखल केला आहे. शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी होणार होती. परंतु सदर महिलेच्या वकिलांनी कागदपत्रे जमा करण्यासाठी न्यायालयाला वेळ मागितला आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाने २४ जून रोजी सुनावणी ठेवली आहे. संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी त्यांच्या घरासमोर दोन अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर संपूर्ण जिल्हा हादरला होता. बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. संजय बियाणी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या एकूण १२ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. परंतु गोळ्या झाडणारे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पत्नी अनिता बियाणी यांनी त्यांचे दीर प्रवीण बियाणी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. अनिता बियाणी यांच्या तक्रारीवरून प्रवीण बियाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अशातच दुसऱ्या एका महिलेने संपत्तीवर हक्क सांगितल्याने बियाणी कुटुंबात नवा वाद निर्माण झाला आहे.
विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क पत्नीनेच करवून घेतला पतीचा खून