पोलिसांनी जिवनसिंग दर्शनसिंग नहार (वय २३ वर्षे, रा. मंचर) आणि श्रीराम रमेश थोरात (वय ३२ वर्ष, रा. मंचर) या दोघांना सुरुवातीला अटक केली. त्यावेळी जिवनसिंग नहार याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन मोबाईल फोन तसेच श्रीराम थोरात याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक मोबाईल फोन जप्त केला आणि आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाकडून आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलीस तपासात कोणती माहिती समोर आली?
संतोष जाधव याने जयेश रतीलाल बहिराम (वय २४ वर्षे, रा घोडेगाव) आणि त्याच्या साथीदाराला मध्य प्रदेशातील मनवर येथे गावठी पिस्टलचा साठा आणण्यासाठी पाठवलं होते. त्याप्रमाणे त्यांनी गावठी पिस्टल आणल्यानंतर संतोष जाधव याने सांगितल्याप्रमाणे वैभव ऊर्फ भोला शांताराम तिटकारे (वय १९ वर्षे, रा. जळकेवाडी, चिखली), रोहीत विठ्ठल तिटकारे (वय २५ वर्षे, रा. सरेवाडी, नायफड ), सचिन बबन तिटकारे (वय २२ वर्षे, रा. धावेवाडी, नायफड), जिशान इलाईबक्श मुंढे (वय २० वर्षे, रा. घोडेगाव), जिवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात, १ विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यासोबत मिळून कट करून त्या सर्वांचे वतीने जीवनसिंग नहार, श्रीराम थोरात व विधीसंघर्षग्रस्त बालक यांना खंडणीची रक्कम आणण्यासाठी पाठवायचे असे ठरवले. त्यानुसार जिवनसंग नहार, श्रीराम थोरात व विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी बोलेरो गाडीतून जाऊन खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न झालं आहे.
पोलिसांनी केले आवाहन
पोलिसांकडून संतोष जाधव याच्या संपर्कात असणाऱ्या मुलांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. संतोष जाधव याने तसंच त्याच्या नावाने इतर कोणी खंडणीची मागणी केली असल्यास अथवा इतर काही तक्रार असल्यास त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे आवाहनही पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आलं आहे.