‌म. टा विशेष प्रतिनिधी, मुंबई

डॉक्टर नाहीत, ॲम्बुलन्स नाहीत, विलगीकरणासाठी जागा उपलब्ध नाहीत, गरिबांपर्यंत धान्य पोहोचू शकत नाही, देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, त्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत, त्यातील सर्वाधिक मृत्यू मुंबईत, सर्वाधिक मृत्यूचा दर मुंबईचा, यानंतर कधी नियंत्रण मिळेल याची खात्री नाही. पालकमंत्री गायब, सर्वपक्षीय नेत्यांना विचारात घेतले नाही, नगरसेवकांशी समन्वय नाही, असे चित्र सध्या देशाच्या आर्थिक राजधानीचे आहे. ८० हजार कोटींच्या ठेवी आणि ३३ हजार ४४१ कोटींचे अंदाजपत्रक असलेली महापालिका करोनाच्या लढाईत २६ जुलैच्या पुराप्रमाणे हतबल असल्याची परिस्थिती आज आहे, अशी खरमरीत टीका भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी शुक्रवारी केली.

मुंबई महापालिका करीत असलेल्या करोनाच्या कामातील अनेक त्रुटी आणि मुंबईकरांचे होत असलेले हाल, यावर शेलार यांनी प्रकाशझोत टाकला. मुंबई महापालिका सद्यस्थितीत ज्या पद्धतीने काम करते आहे, ते पाहिल्यावर पुन्हा एकदा २६ जुलैच्या पुराप्रमाणे मुंबईचे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, असे शेलार म्हणाले.

………………………..कापता येईल…………………..

मुंबईसह राज्यातील पहिला रुग्ण ९ मार्चला उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर आता १५ एप्रिलला मुंबई महापालिका कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांची भरती करण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करते. तर रुग्णवाहिका आणि चालकांच्या भरतीसाठी १७ एप्रिलला जाहिरात काढते. म्हणजेच महापालिकेकडे रुग्णवाहिका, डॉक्टर यांचा तुटवडा असून, अजून १५ दिवस तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. सुरक्षा किट नाहीत म्हणून पालिकेच्या शताब्दी, कुपर, भाभा रुग्णालयात डॉक्टरांना आंदोलने करावी लागत आहेत, तर मास्क, स्कॅनिंग करण्यात येत नसल्याने त्यांच्या जिवाला धोका आहे, असे शेलार म्हणाले.

करोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे डॉक्टर, परिचारिका यांना करोनाचा सर्वाधिक धोका असतो. या परिस्थितीत डॉक्टर-परिचारिकांना सुरक्षित साधने आणि इतर सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयात परिचारिकांची काळजी घेतली जात नाही, असाही आरोप त्यांनी केला.

मुंबईत रुग्ण वाढत आहेत तसा मुत्युदरही जास्त आहे, हे लक्षात येण्यासाठी महापालिकेला १५ ते २० दिवसांचा विलंब झाला. त्यामुळे विलंबाने समिती स्थापन करण्यात आली, टास्क फोर्स निर्माण करण्यात आला आहे. या संपूर्ण कामात महापालिकेकडून होत असलेल्या विलंबाचा परिणाम मुंबई पुन्हा रुळावर येण्यावर होणार आहे. परिणामी मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचे आर्थिक नुकसान होणार आहे, याचे भान मुंबई महापालिकेला आहे का, असा सवालही शेलार यांनी विचारला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here