मध्य प्रदेशचा संघ २३ वर्षांनी अंतिम फेरीत
मध्य प्रदेशनं पहिल्या डाव्यात ३४१ आणि दुसऱ्या डावात २८१ धावा केल्या. पश्चिम बंगालच्या संघानं पहिल्या डावात २७३ धावा केल्या. चौथ्या डावात बंगालला ३५० धावा करायच्या होत्या. मात्र बंगालचा डाव १७५ धावांत संपुष्टात आला आणि त्यांनी १७४ धावांनी विजय मिळवला. मध्य प्रदेशच्या संघानं २३ वर्षांनंतर रणजीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
मध्य प्रदेशचा फिरकीपटू कुमार कार्तिकेयनं ५ फलंदाजांना बाद केलं. १२८ धावा देत त्यानं ८ फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. बंगालचा कर्णधार अभिन्यू इश्वरननं दुसऱ्या डावात ७८ धावांची खेळी साकारली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही. बंगालच्या चारच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या रचता आली. गौरव यादवनं ३ आणि सारांश जैननं २ गडी बाद करत कार्तिकेयला उत्तम साथ दिली.
मुंबईची अंतिम फेरीत धडक
४१ वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईनं उत्तर प्रदेशला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधीच दिली नाही. पहिल्या डावात ३९३ धावा करणाऱ्या मुंबईनं उत्तर प्रदेशचा पहिला डाव १८० धावांत गुंडाळला. दुसऱ्या डावात मुंबईच्या तरुण फलंदाजांनी उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांना यश मिळालं नाही. मुंबईची रनमशीन अशी ओळख असणारा सरफराज खान ५९, तर मुलानी ५१ धावांवर नाबाद राहिले. त्याआधी यशस्वी जयस्वालनं १२७ धावांची खेळी साकारली. मुंबईचा संघ ४७ वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०१५-१६ मध्ये मुंबईनं अखेरचा रणजी करंडक जिंकला आहे. आता ४२ व्यांदा करंडकावर नाव कोरण्याची संधी मुंबईकडे चालून आली आहे.