मुंबई: विधान परिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली असताना शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत बोलावूनही नेतृत्त्वानं भेट न घेतल्यानं शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचं वृत्त झी २४ तास या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेचे आमदार वेस्ट इन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. मात्र मुंबईत बोलावूनही नेतृत्त्वानं भेट घेतली नसल्यानं आमदारांमध्ये नाराजी असल्याचं कळतं. विधान परिषदेची निवडणूक अवघ्या २ दिवसांवर आली असताना शिवसेनेत समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. याचा फटका शिवसेनेला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदारांना रात्री उशिरा फोन करून मुंबईत दाखल होण्यास सांगितलं गेलं. मात्र मुंबईत आल्यानंतर पक्ष नेतृत्त्वानं भेट न घेतल्याची भावना आमदारांमध्ये आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते असलेल्या एकनाथ शिंदेंना डावलण्यात आल्याची, विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींपासून त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जात आहे.
‘ती’ चूक पुन्हा नको! शिवसेना लागली कामाला; हॉटेलमध्ये हालचाली वाढल्या
असं काही शिवसेनेत होत नाही- राऊत
शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा असताना त्याबद्दल खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोणतं नेतृत्त्व अन् कसले मतभेद? शिवसेनेत असलं काही होत नाही, होणारदेखील नाही. अशी चर्चा करणाऱ्यांना शिवसेनेचं अंतरंग अद्याप कळलेलं नाही, असं राऊत म्हणाले.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. १० जागांसाठी एकूण ११ उमेगवार रिंगणात आहेत. १० व्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होईल. उमेदवाराला विजयासाठी २७ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि सचिन अहिर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडे असलेलं संख्याबळ पाहता दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here