रत्नागिरी : साडीच्या झोपाळ्यात खेळताना फास लागून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झल्याची धक्कादायक घटना गुहागर तालुक्यात घडली आहे. निहाल सुभाष जाक्कर असं या मुलाचं नाव आहे. निहाल हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे. शुक्रवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान निहाल एकटाच माळ्यावर खेळायला गेला होता. याच दरम्यान साडीच्या झोपाळ्यात मान अडकून त्याचा दुर्दैवी अंत झाला. शनिवारी या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती जितेंद्र दत्ताराम वायंगणकर यांनी गुहागर पोलीस ठाणे येथे दिली. त्यानुसार जितेंद्र वायंगणकर हे पालशेत बाजारपेठेत राहतात. वायंगणकर यांच्या घरी त्यांची पत्नी अपेक्षा, मुलगी श्रेया, त्यांचा आतेभाऊ सुभाष जाक्कर, त्यांची पत्नी शकुंतला जाक्कर, त्यांची मुले सृष्टी, निहाल व स्वराज अशी दोन कुटुंब एकत्र राहतात. महिनाभरापूर्वी घरातील मुलांना खेळण्याकरता घराच्या माळ्यावर जितेंद्र वायंगणकर यांनी नायलॉनच्या साडीचा झोपाळा बांधलेला होता. या झोपाळ्यावर स्वराज, श्रेया आणि निहाल हे दररोज खेळायचे.

‘अग्निपथ’च्याविरोधाची मुंबई रेल्वेला झळ, १८ ट्रेन रद्द; ‘आरपीएफ’ला दक्ष राहण्याच्या सूचना

जितेंद्र वायंगणकर यांचा साखरी आगर येथे बेकरी व्यवसाय आहे. १८ जून रोजी शुक्रवारी जितेंद्र वायंगणकर रात्री ९ वाजता बेकरीतील काम आटोपून घरी आले. त्यानंतर नंदकुमार धोपावकर यांच्याशी फोनवर बोलत असताना जितेंद्र वायंगणकर घराच्या माळ्यावर गेले. तिथे त्यांच्या आतेभावाचा मुलगा निहाल नायलॉन साडीच्या झोपाळ्यात अडकलेला त्यांना दिसला. निहालच्या मानेला साडी गुंडाळली गेली होती. जितेंद्र यांनी तातडीने सुभाषला बोलावले. दोघांनी नायलॉन साडीच्या झोपाळ्यात अडकलेल्या निहालला बाहेर काढलं आणि तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर शोकाकूल वातावरणात पालशेतमध्ये निहाल जाक्कर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास गुहागरचे प्रभारी पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here