जबाबदारीचं; पण सुखावणारं नातं!

भावनिक झालोबाबा झाल्यावर मी अधिक जबाबदार तर झालोच; पण त्याचबरोबर मी खूप भावनिकही झालो. अर्जुनचा जन्म आमच्यासाठी खूप आनंद देणारा क्षण होता. हा प्रवास खूप काही शिकवणारा आहे. नवनवीन आव्हानं पेलायलादेखील तितकीच मजा येतेय. मी आणि माझी बायको अनेक गोष्टी अजूनही शिकतोय. कोणीतरी मला बाबा म्हणणार आहे ही भावना सुखावह आहे. सध्या विविध कामांमुळे त्याला जास्त वेळ देता येत नसला तरीही माझा इतर मोकळा वेळ हा फक्त त्याचाच असतो.
– आरोह वेलणकर

राघवचा बाबा मित्रराघवचा जन्म झाल्यानंतर सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला. माझ्याकडे बघून कोणीतरी शिकणार आहे, मी कोणाचा तरी सुपरहिरो असणार आहे आणि इतकी वर्षं मी कोणाला तरी बाबा म्हणत होतो; पण आता मला कोणीतरी बाबा म्हणणार आहे या सगळ्या भावना प्रचंड समाधान देणाऱ्या आहेत. मला ओरडणारा किंवा लाड करणारा बाबा यापेक्षा रघवचा मित्र बाबा व्हायचंय. राघव हा माझा सगळ्यात लहान बेस्ट फ्रेंड आहे.
– संग्राम साळवी

यंदाचा दिवस खासमाझी लेक मीरा लॉकडाउनमध्ये जन्माला आली. त्यावेळी चित्रीकरणाच्या निमित्तानं मी बरेच महिने बाहेर होतो. तिच्याबरोबर फारसा वेळ घालवता आला नाही; त्यामुळे यावर्षी खऱ्या अर्थानं माझा पहिला फादर्स डे आहे. गेल्या एक-दोन महिन्यांपासून मी तिला जास्तीत जास्त वेळ देतोय. मीरा झाल्यापासून एक मजेशीर बदल म्हणजे सध्याची गाणी सोडून मी फक्त लहान मुलांची बडबड गीतं गुणगुणायला लागलो आहे. अनेकदा पाहिलेल्या चित्रपटांमधील बापलेकीच्या हळव्या क्षणांचा खरा अर्थ आता कळतोय.
– सचिन देशपांडे

बाबा ही एक भावना
बाबा हा फक्त एक शब्द नाहीय. ती एक भावना आहे, जबाबदारी आहे आणि सुखावणारी गोष्ट आहे. रुआनच्या जन्मापर्यंत आणि जन्मानंतरही रूचीनं मला नेहमीच साथ दिली. आम्ही दोघंही एकमेकांच्या साथीनं पुढे जातोय आणि नवनवीन गोष्टी शिकतोय. बाबांना येणारी आव्हानं, सामोरं जायला लागणाऱ्या गोष्टी या सगळ्याची जाणीव होतेय. कामाचं महत्त्व कमी झालं नसलं तरी आता माझा मोकळा वेळ हा त्याच्याबरोबर घालवण्याचा मी प्रयत्न करत असतो. रुआनला कणखर बनवायचं आहे.
– अंकित मोहन

संकलन : अवनी परांजपे, पोदार कॉलेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here