तलवारीने हल्ला: गावातील निवडणुकीनंतर जोरदार राडा; तलवारीने केलेल्या हल्ल्यात १ ठार, ३ जखमी – disputes between two groups after village elections; one killed, three injured in sword attack
अहमदनगर : राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी चुरस निर्माण झालेली असताना गावपातळीवरही निवडणुकांमुळे वातावरण तापलं आहे. केवळ ग्रामपंचायतीच नव्हे तर गावातील विकास सोसायट्यांच्या निवडणुकाही रक्तरंजित होऊ लागल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील सोसायटीच्या निवडणुकीनंतर दोन गटांत तुफान मारामारी झाली. यावेळी तलवारीने हल्ला केल्याने एक जण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.
पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शनिवारी मतदान होऊन सायंकाळी निकाल लागला. यामध्ये सत्ताधारी गटाला ११ जागा मिळाल्या तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या. निवडणूक निकालानंतर विजयी गटाने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. यासाठी जेसीबी आणला होता. जेसीबीतून गुलालाची उधळण सुरू होती. याचवेळी दोन गटात वाद झाला आणि तुफान मारामारी सुरू झाली. या राड्यात तलवारींनी चौघांवर वार करण्यात आले. बविआची मतं राष्ट्रवादीला जाण्याची धास्ती; भाजपची धावाधाव, फडणवीसांचा ठाकूरांना फोन
तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात अजय गोरख पालवे याचा मृत्यू झाला आहे, तर विष्णू कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या अजय पालवे याला रुग्णालयात नेताना त्याने प्राण सोडले. इतर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली. या मागणीसाठी सुमारे दोन तास रास्तारोको करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली. रात्रभर गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अग्निपथ योजनेविरोधात तरुण रस्त्यावर,आंदोलनाला हिंसक वळण; रेल्वेवर दगडफेक