मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडे चार उमेदवारांना निवडून आणल्यानंतर फक्त दोन मतं अतिरिक्त उरतात. तरीही भाजपने पाचवा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला २० पेक्षा अधिक मतांची गरज आहे. ही मतं भाजप (BJP) कुठून आणणार आहे? त्यासाठी भाजपकडून आमदारांची फोडाफोडी, दहशत आणि दबावाचा वापर होईल. भाजपला चोऱ्यामाऱ्या केल्याशिवाय ही २० मतं मिळणे शक्यच नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Vidhanparishad Election 2022)

यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. काँग्रेसच्या उमेदवाराला मत देण्यास शिवसेना आमदारांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबद्दल संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी हा दावा सपशेलपणे फेटाळून लावला. भाजप निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक या अफवा पसरवत आहे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. कोणी कोणाला मतदान करायचे, यासंदर्भातही निर्णय झाले आहेत. त्यामुळे भाजपने कितीही अफवा पसरवल्या तरी विधानपरिषद निवडणुकीत त्यांना यश येणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
बविआची मतं राष्ट्रवादीला जाण्याची धास्ती; भाजपची धावाधाव, फडणवीसांचा ठाकूरांना फोन
भाजपने जादा उमदेवार रिंगणात उतरवल्यामुळेच सगळा पेच निर्माण झाला आहे. आमदारांना विधानपरिषद निवडणुकीची मतदानप्रक्रिया समजावून सांगण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवावे लागत असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीची दोन मतं कमी करण्यासाठीच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. खून केलेल्या व्यक्तीलाही मतदानाचा हक्क असतो. मात्र, अनिल देशमुख आणि नवाब मलिक आमदार असूनही त्यांना मतदानाचा हक्क नाकारला जात असल्याचे राऊत यांनी म्हटले.

फडणवीसांचा मास्टरप्लॅन ठरला

विधानपरिषद निवडणुकीत पाचव्या जागेवरील उमेदवार कसा निवडून आणायचा, यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली आहे. या रणनीतीबद्दल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) संध्याकाळी सहा वाजता भाजप आमदारांना मार्गदर्शन करतील. राज्यसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले होते. त्यामुळे आता विधानपरिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस तशीच कमाल करून दाखवणार का, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here